कागल पंचायत समितीच्या मासिक सभेत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा; कठोर कारवाई व उपाययोजनांचे आदेश

कागल (एस.  सणगर): कागल पंचायत समितीची मासिक सभा मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ रोजी सभापती सौ. सुवर्णा शशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेमध्ये तालुक्यातील आरोग्य, शिक्षण, रस्ते विकास आणि ऊर्जा क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली व संबंधित विभागांना आवश्यक निर्देश देण्यात आले.

Advertisements

सभेतील प्रमुख मुद्दे व निर्णय खालीलप्रमाणे:

स्त्री-भ्रूण हत्येविरोधात कठोर कारवाई: तालुक्यात स्त्री-भ्रूण हत्या व गर्भलिंग निदानाला आळा घालण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक प्रभावी कारवाई करावी, असे निर्देश सभापतींनी दिले. बिद्री परिसरातील घटनांचा संदर्भ देत सदस्य श्री. बालाजी फराकटे यांनी कठोर कारवाईची मागणी केली.

Advertisements

शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणेचे आदेश: मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्या कागल दौऱ्यादरम्यान शाळांच्या पाहणीत शैक्षणिक गुणवत्तेबाबत त्रुटी आढळल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. शिक्षण केवळ शिष्यवृत्तीपुरते मर्यादित न ठेवता सर्वच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला देण्यात आले.

रस्त्यांची डागडुजी व खड्डे भरणे: मान्सून संपत आल्याने ग्रामीण, राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे तात्काळ भरून डागडुजी करण्याची मागणी उपसभापती श्री. इंद्रजित पाटील यांनी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची पाहणी करून त्वरीत कामे सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Advertisements

घरकुल लाभार्थ्यांसाठी ‘रूफ टॉप सोलर’ योजना: घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी महावितरणमार्फत राबवल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या सौर ऊर्जा (रूफ टॉप सोलर) योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

सायंकाळी ७ ते ९ ‘नो टीव्ही, नो मोबाईल’: ग्रामीण भागातील मुलांमध्ये अभ्यासाची सवय रुजवण्यासाठी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत टीव्ही व मोबाईल बंद ठेवून स्वयं-अध्ययन करण्याची नाविन्यपूर्ण संकल्पना राबवण्याच्या सूचना सदस्य श्रीम. सुनिता माळी व सौ. रंजना अस्वले यांनी शिक्षण विभागास दिल्या.
शाळा व अंगणवाड्यांमध्ये सकस आहार: जि. प. शाळा व अंगणवाड्यांमध्ये विद्यार्थ्यांना शासनाच्या निकषानुसार स्वच्छ, पौष्टिक व सकस आहार मिळण्यासाठी शिक्षण आणि महिला-बालकल्याण विभागाने दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले. सर्व पदाधिकारी स्वतः वेगवेगळ्या मतदारसंघांत जाऊन याची पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले.

सभेचे कामकाज गटविकास अधिकारी (सचिव) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या सभेस पंचायत समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, कार्यालय प्रमुख व विविध लाईन डिपार्टमेंटचे अधिकारी उपस्थित होते. सभेचे नियोजन कक्ष अधिकारी व अधीक्षक यांनी पाहिले.

Leave a Comment

error: Content is protected !!