मुरगूड येथे जागतिक पर्यावरण दिनी वृक्षाचा १९ वा वाढदिवस साजरा

मुरगूड निसर्गमित्रचा अनोखा उपक्रम

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील मुरगूड शहर निसर्ग मित्र मंडळ व उज्जैनकर फाउंडेशन कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त २३ वर्षांपूर्वी लावलेल्या सप्तपर्णी वृक्षाचा वाढदिवस वृक्ष पूजन व केक कापून साजरा करण्यात आला. मुरगूडच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. सुहासिनीदेवी पाटील व उपनगराध्यक्षा श्रीमती रेखाताई मांगले यांच्या हस्ते यावेळी केक कापून वृक्षाचा अनोखा वाढदिवस साजरा करण्यात आला.

Advertisements

मुरगूड येथील वनश्री मोफत रोपवाटिकेचे संचालक वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी यांनी निसर्गमित्र मंडळाच्या माध्यमातून २३ वर्षांपूर्वी वृक्षारोपण केलेल्या सप्तपर्णी वृक्षाचा प्रातिनिधीक स्वरूपामध्ये जागतिक पर्यावरण दिना चे औचित्य साधत पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपणाचा संदेश देत हा वाढदिवस साजरा केला.
जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यामध्ये मुरगूड नगरपरिषद शेजारी सप्तपर्णी वृक्षाचा वाढदिवस, वृक्षारोपण, बीजसंकलन, बियांची हवाई पेरणी अशा उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे.

Advertisements

याप्रसंगी आपल्या स्वागत प्रास्ताविकपर मनोगतामध्ये वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी यांनी  वृक्षारोपण आणि वृक्षाचे महत्व यासंबंधी मार्गदर्शन करताना वृक्षमित्र सूर्यवंशी म्हणाले, जागतिक तापमान वाढीची झळ यावर्षी सर्वांनाच प्रकर्षाने चटके देऊन गेली आहे . कडाक्याचा उन्हाळा सर्वांनाच पोळून सोडत आहे. वृक्षतोडीचा हा दुष्परिणाम सर्वांनी आता तरी मनावर घेणे गरजेचे आहे. त्यासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन हाच एकमेव उपाय असल्याचे आणि तो प्रत्येकाने कर्तव्य बुद्धीने पार पाडण्याची काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी प्रतिपादन केले

  या कार्यक्रमास राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त लेखक मा.ग. गुरव, एम.टी. सामंत, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष एम बी कानकेकर, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर प्रा. रवींद्र शिंदे, नगरसेवक एस व्ही चौगले, दत्ता मंडलिक, सुनील रणवरे, रणजीत भारमल, सुनील मंडलिक नगरसेविका सौ गीता आंगज, वैशाली गोधडे, सुरेखा लोकरे,यांच्यासह डी एल कुंभार, प्रशांत हळकर, मृत्युंजय सूर्यवंशी,  प्रशांत सणगर, गुंडा हळदकर तसेच पत्रकार संघाचे सर्व सदस्य, नगरपरिषदेचे अधिकारी,कर्मचारी आणि वृक्षप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!