कागल : केंद्र शासनाच्या ‘सुपोषित ग्रामपंचायत’ अभियानात कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द ग्रामपंचायतीने घवघवीत यश मिळवले आहे. कुपोषण निर्मूलनाच्या प्रभावी कामासाठी या गावाला केंद्र सरकारकडून १ लाख रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर झाले आहे. विशेष म्हणजे, कोल्हापूर जिल्ह्यातील १८ गावांपैकी कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द हे एकमेव गाव ठरले आहे. अंगणवाडी सेविका आणि आरोग्य विभागाच्या चोख नियोजनामुळे गावाने कुपोषणाचे प्रमाण शून्यावर आणले आहे.
केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘सुपोषित ग्रामपंचायत’ अभियानात कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक पटकावून मोठे यश संपादन केले आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींची उत्कृष्ट कार्याबद्दल निवड करण्यात आली असून, यामध्ये कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द या एकमेव गावाची निवड झाल्याने गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या निवडीबद्दल केंद्र शासनाच्या वतीने पिंपळगाव खुर्द ग्रामपंचायतीला १ लाख रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस आणि विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पोषण अभियानांतर्गत गावातील बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि कुपोषण निर्मूलनासाठी केलेल्या प्रभावी कामाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतींपैकी केवळ १८ गावांनी ही मजल मारली असून, त्यात पिंपळगाव खुर्दने आपले स्थान निश्चित केले आहे.
अभियानादरम्यान गावातील अंगणवाडी केंद्रांमार्फत बालकांच्या वजनावर आणि आहारावर विशेष लक्ष देण्यात आले होते. ज्या ग्रामपंचायतींमध्ये मध्यम व तीव्र कमी वजनाची बालके राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहेत, अशा गावांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पिंपळगाव खुर्दमध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आरोग्य विभागाच्या चोख नियोजनामुळे कुपोषणाचे प्रमाण शून्यावर आणण्यात मोठे यश मिळाले आहे.
कागल तालुक्यातून केवळ पिंपळगाव खुर्दची निवड झाल्याने संपूर्ण तालुक्यातून ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे. या पुरस्कारामुळे गावातील आरोग्य सुविधांना अधिक बळकटी मिळणार आहे. ग्रामपंचायतीच्या या यशात बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा मोलाचा वाटा आहे. पिंपळगाव खुर्दने जिल्ह्यासमोर एक आदर्श निर्माण केला असून, आगामी काळातही कुपोषणमुक्त गाव ही ओळख कायम राखण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.