मुरगूडमध्ये शिवजयंतीचा उत्साह; व्याख्यान, सत्कार आणि सामाजिक उपक्रमांनी रंगला सोहळा

मुरगूड (प्रतिनिधी, शशी दरेकर): मुरगूड (ता. कागल) येथील बाजारपेठ शिवप्रेमींच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळपासूनच शहरात शिवरायांच्या जयघोषाने चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.

Advertisements

प्रतिमा पूजन आणि श्रद्धांजली

सकाळी ठीक १० वाजता उद्योजक विजय सापळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक आनंदराव कल्याणकर (सर) आणि मालवण येथील सामाजिक कार्यकर्त्या व उद्योजिका सौ. विद्या पॅलीस फर्नांडिस यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात शिवभक्त धोंडीराम परीट यांनी सादर केलेल्या शिव प्रार्थनेने झाली, ज्याला उपस्थित सर्व शिवप्रेमींनी उत्स्फूर्त साथ दिली. यावेळी देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानांना आणि दिवंगत शिक्षकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Advertisements

‘शिवरायांचे आज्ञापत्र’ विषयावर व्याख्यान

कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे विनय कुलकर्णी (सर) यांचे ‘छत्रपती शिवरायांचे आज्ञापत्र’ या विषयावरील व्याख्यान. शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य आणि त्यांचे विचार आजही कसे लागू पडतात, यावर त्यांनी प्रकाश टाकला. यावेळी सौ. विद्या फर्नांडिस यांना धोंडीराम परीट यांच्याकडून शिवरायांच्या जीवनावरील पुस्तक भेट देण्यात आले.

गुणवंतांचा आणि निवृत्त शिक्षकांचा सन्मान

या सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा गौरव करण्यात आला:

Advertisements
  • मारुती उर्फ बटू जाधव: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार.
  • रविंद्रकुमार जालीम: पहिली ते दहावीपर्यंत मोफत ट्यूशन क्लासेस घेणाऱ्या या शिक्षकांचा सपत्नीक यथोचित सत्कार करण्यात आला.
  • निवृत्त शिक्षक: समाजाची पिढी घडवणाऱ्या ४२ सेवानिवृत्त शिक्षकांचा पुष्पगुच्छ आणि शिवप्रतिमा देऊन सपत्नीक सन्मान करण्यात आला.

तसेच, सौ. समिरा जमादार, सौ. माया मोरबाळे, सौ. रंजना देवळे, नगरसेविका सौ. विजयमाला शिंदे, सौ. वैशाली गोधडे, शंकर कांबळे, इंजिनिअर आकाश दरेकर आणि गौरव मोर्चे यांनी शिवरायांच्या कार्यावर आपली मनोगते व्यक्त केली.

मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्याला उद्योगपती प्रवीण दाभोळे, अमर देवळे, श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन किरण गवाणकर, माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, नगरसेवक शिवाजी चौगले, राहुल शिंदे, सुनील रणवरे, संदीप कांबळे, शशिकांत दरेकर, उद्धव मिरजकर, अमित दरेकर, लालू चित्रकार, अमर कापशे, ओंकार दरेकर, बंटी गवाणकर, गणेश कुडवे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला आणि शिवप्रेमी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन विनय कुलकर्णी यांनी केले, प्रास्ताविक विकी साळोखे यांनी मांडले, तर आभार धोंडीराम परीट यांनी मानले.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!