तलावापासून काही अंतरावर होणार स्थलांतर – मंत्री हसन मुश्रीफ यांचे आदेश
पिंपळगाव खुर्द, दि. २२: पिंपळगाव खुर्द ता. कागल येथील शासकीय होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि दवाखान्याच्या जागेचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता. यासंदर्भात राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आज स्वतः वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत पिंपळगाव खुर्द येथे भेट देऊन स्थळपाहणी केली. गेल्या काही दिवसांपूर्वी श्री. मुश्रीफ यांनी या प्रश्नात लक्ष घालून योग्य मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर आजची ही पाहणी अत्यंत महत्त्वाची ठरली.
या पाहणी दौऱ्यात मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी कुलदीप बोगे, प्रांत अधिकारी प्रसाद चौगुले यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमी अभिलेख आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी गावातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली बाजू मांडली. मुश्रीफ यांनी गावकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केले आणि गावातील गायरान क्षेत्राची सविस्तर पाहणी केली.

याबाबत अधिक माहिती अशी, दवाखान्याची नियोजित जागा तलावाच्या अगदी शेजारी असल्याने त्याबाबत काही तांत्रिक आणि स्थानिक अडचणी होत्या. याची दखल घेत मंत्री श्री. मुश्रीफ यांनी तलावापासून काही अंतरावर असलेल्या जागेवर दवाखाना स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. या नवीन जागेसाठी लागणाऱ्या सर्व कायदेशीर आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. दवाखाना तलावा शेजारी न बांधता सुरक्षित अंतरावर बांधण्यावर त्यांनी यावेळी शिक्कामोर्तब केले.
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या या निर्णयामुळे मेडिकल कॉलेज व दवाखान्याच्या जागेचा प्रलंबित असलेला पेच आता सुटला आहे. तलावापासून काही अंतरावर दवाखाना होणार असल्याने पर्यावरणाचे रक्षणही होणार आहे आणि गावकऱ्यांना अद्ययावत आरोग्य सुविधा मिळण्याचा मार्गही सुकर झाला आहे. प्रशासनाने आता यावर तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले आहेत.
पिंपळगाव खुर्द ता. कागल येथे होत असलेल्या शासकीय होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलची स्थळपाहणी दरम्यान मंत्री हसन मुश्रीफ. सोबत प्रांत अधिकारी प्रसाद चौगले, तहसीलदार अमरदीप वाकडे, गट विकास अधिकारी कुलदीप बोगे व इतर अधिकारी वर्ग आणि ग्रामस्थ.