मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या इमारतीमध्ये प्रथमच महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा पार पडल्या. एकूण 480 परीक्षार्थ्यांची या केंद्रावर तिन मजली इमारतीमध्ये बैठक व्यवस्था करण्यात आली होती. केंद्रावर एकूण 320 परीक्षार्थींनी परीक्षा दिली. 160 विद्यार्थी अनुपस्थित होते. अशी माहिती केंद्र संचालक व शिवराजचे प्राचार्य बी. आर. बुगडे यांनी दिली. शिवराज हायस्कूलमध्ये एनएमएमएस, एनटीएस, शिष्यवृती, इंटर मिजिएट, इलेमेंटरी, प्रज्ञा शोध, नवोदय, दहावी बारावी बोर्ड आदी प्रकारच्या शालेय परीक्षा होतात. मात्र स्पर्धा परीक्षेमधील नोकरभरतीसाठीची पोलीस भरती परीक्षा प्रथमच होणार असल्याने मुरगूड पोलिसांसह शिवराज व अन्य शाळांचा स्टाफ परीक्षा व्यवस्थित पार पडाव्यात यासाठी प्रयत्नशील होते.
20 खोल्यांमध्ये प्रत्येकी 24 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी सर्व पर्यवेक्षकांना केंद्रसंचालक बी. आर. बुगडे, उपकेंद्र संचालक रवींद्र शिंदे व एस. पी. कांबळे, परीक्षानियंत्रक पोलीस उपनिरीक्षक संदीप वांगणेकर व रूट हेड संदेश सावंत यांनी सुपरव्हिजनबाबत स्टाफला आवश्यक त्या सूचना दिल्या.
मुरगूडसह सिंधुदूर्ग पोलिस ठाण्याच्या स्टाफने चोख बंदोबस्त ठेवला होता. सोलापूर, नांदेड, लातूर, बिड, उस्मानाबाद, जळगाव, नाशिक येथून परीक्षार्थी परीक्षा देण्यासाठी आले होते. एसटी बंद आणि सामान्य परिस्थितीचे अनेक जण दुचाकीची जोडणी लावून शेकडो कि.मी. अंतर कापून या परीक्षेसाठी आले होते. मंडलिक युवा प्रतिष्ठानच्या वतीने परिक्षार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले.