कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीमधून पोलीस दलासाठी घेण्यात आलेल्या रु. 4 कोटी 65 लाख रुपयांची 111 अद्ययावत वाहने आज पोलीस दलाला सुपूर्द करण्यात आली. यामध्ये 47 चारचाकी व 64 दुचाकींचा समावेश आहे.
पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनामार्फत अनेक उपक्रम, योजना राबविण्यात येत असून यापुढेही पोलीस दलासाठी भरीव निधी उपलब्ध करुन दिला जाईल.
पोलीस दलानेही गुणात्मकदृष्ट्या काम करण्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्यास प्राधान्य देण्यात यावे.
कोरोना महामारीच्या काळात पोलीस दलाने कौतुकास्पद काम केले असून गुन्हे उकल करण्यामध्येही उल्लेखनीय काम आहे. यापुढेही कोल्हापूर पोलीसांनी लोकाभिमुख होऊन काम करावे. पकडण्यात आलेला मुद्देमाल ठेवण्यासाठी केंद्रस्तरीय स्ट्रॉग रुम तयार करावी.
पोलीस दलास उपलब्ध करुन देण्यात आलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांमुळे कोल्हापूर पोलीस दल अधिक सक्षम व गतीमान होऊन काम करेल, असा विश्वास राज्य गृहमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
पोलीसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच नागरिकांबरोबर सौहार्दाचे वातावरण निर्माण करावे,तसेच, व्यसनाधीनतेकडे आकर्षित होणाऱ्या तरुण पिढीकडे विशेष लक्ष द्यावे. यासाठी अंमली पदार्थ विरोधी मोहीम गतीमान करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.