मुरगूड (शशी दरेकर) : “राजीव गांधी यांच्या विचार आणि कार्याचा युवकांनी आदर्श घ्यावा तसेच देशासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवून राष्ट्र उभारणीच्या कामात झोकून घ्यावे” असे मत आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. सतीश देसाई यांनी अध्यक्षस्थानावर बोलताना व्यक्त केले.
ते गगनबावडा येथील आनंदी महाविद्यालयात आयोजित स्व. राजीव गांधी यांच्या ८८ व्या जयंतीनिमित्त बोलत होते. संस्था सचिव प्रा. डॉ. विद्या देसाई या कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या की, आधुनिक पुरोगामी विचारांच्या माध्यमातून देशाला बळकटी प्राप्त करून देण्यासाठी राजीव गांधींनी अथक प्रयत्न केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील म्हणाले की, “नवा भारत घडविण्यासाठी माहिती, तंत्रज्ञान आणि डिजिटल इंडियाच्या माध्यमातून राजीव गांधी यांनी आधुनिक भारताचे स्वप्न साकारले आणि १८ वर्षांवरील युवकांना राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला, या बळावर आजची तरुण पिढी सक्रिय होत आहे”.
या कार्यक्रमास मा. विशाल देसाई, मा. औदुंबर जाधव, डॉ. संतोष भोसले, प्रा. राहुल कांबळे आदी प्राध्यापक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमापूजनाने झाली. स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. एस. एस. पानारी तर आभार प्रा. आदिनाथ कांबळे यांनी आभार मानले.