मुरगुडात शिवराजमध्ये योग गुरु जयराम पाटील यांनी दिले योगाचे धडे
मुरगूड (शशी दरेकर) : योग -प्राणायामाने शारीरिक आरोग्य, मानसिक ताण-तणाव कमी होतो हे विज्ञानाने ही मान्य केले आहे. आजच्या सामाजिक स्थितीमध्ये सर्व वयोगटातील ७५ टक्के स्त्री-पुरुषांना अनेक व्याधींनी ग्रासले आहे. म्हणूनच योगाचा स्वीकार करणे ही आज काळाची गरज आहे. योग -प्राणायाम हा साधन रहित व परिणामकारक व्यायामप्रकार असल्याचे मत योगगुरु जयराम पाटील यांनी व्यक्त केले.
ध्यान, योग, प्राणायामाची प्रात्याक्षिके प्रत्यक्ष विद्यार्थी -विद्यार्थीनीकडून करवून घेताना पाटील म्हणाले, आज अनेक विकारानी कमी -अधिक प्रमाणात लोकांना ग्रासले आहे. प्रगत वैद्यकीय शास्त्र सेवेला पावलोपावली उपलब्ध असले तरीही शारीरिक व मानसिक स्तरावरील आजार वाढतच आहेत . ही चिंतेची बाब आहे. आनंददायी जीवनशैली, मानसिक शांतता, व्यक्तिमत्व विकास आणि उत्तम आरोग्य, बलवान शरीर यापासून सर्वच वयोगटातील स्त्री-पुरुष वंचित आहे .म्हणूनच योगाचा स्वीकार करणे ही आज काळाची गरज आहे कौटुंबिक शैक्षणिक सामाजिक राजकीय स्तरावर असणारी उदासीनता त्यामुळे योगाचा प्रसार आणि प्रचार होणे नितांत गरजेचे आहे.
उपप्राचार्य रविंद्र शिंदे यांनी स्वागत तर प्राचार्य पी. डी. माने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत निवड झालेल्या हर्षद बच्चे आणि विभागीय शालेय तायक्वानदो स्पर्धेत निवड झालेल्या साक्षी गोरुले यांचा योगगुरू पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व विद्यार्थी -विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा. सुनिल डेळेकर यांनी आभार मानले.