जागतिक अल्झायमर दिन (World Alzheimer’s Day) हा दरवर्षी 21 सप्टेंबर रोजी संपूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो. अल्झायमर हा विस्मरणाशी संबधीत आजार आहे. यावर्षीच्या अल्झायमर आजाराची थिम डिमेन्शिया बद्दल विचारा, अल्झायमर बद्दल विचारा.. ही आहे. यामध्ये अल्झायमर आजाराबद्दल माहिती देणे, लवकर निदान करणे, उपचारासाठी प्रोत्साहन देणे, सामाजिक कलंक कमी करणे, आजाराबद्दलची जागरुकता वाढविणे व खुल्या संवादाला प्रोत्साहन देणे.
अल्झायमर हा एक जुनाट आणि पुर्ववत न करता येणारा स्मरणशक्तीशी संबंधीत आजार आहे. ज्यामुळे स्मृतीभंश, विचार, वागणुकीत व भाषेमध्ये समस्या निर्माण होतात. ज्यामुळे दैनंदिन कामकाजात अडथळा निर्माण होतो.

अल्झायमर आजारामध्ये मेंदूमधील चेतापेशी मृत होतात आणि पेशीमधील न्युरोट्रांसमीटर रसायन कमी होतात. विसराळूपणा किंवा स्मरणशक्ती कमी होणे हे यामध्ये प्रमुख लक्षण दिसून येते. अगदी अलीकडील संभाषणे किंवा घटना विसरणे नवीन माहिती लक्षात ठेवण्यात समस्या निर्माण होणे. एकाच विषयावर अनेकदा बोलणे. घरातल्या घरात वस्तू हरवणे, गोंधळ व दिशाहिन वागणे, बोलणे किंवा कोणता दिवस, महिना, वर्ष हे न आठवणे, झोप विस्कळीत होणे, कपडे घालण्यात असमर्थतता, खाण्यात व गिळण्यामध्ये अडचण येते. वेळ, काळ न समजणे, कपड्यामध्ये लघवी करणे इत्यादी गंभीर समस्या जाणवतात.
या आजाराचे निदान करण्यासाठी मिनी मेंटल स्टेट एक्झामिनेशन यामध्ये संज्ञानात्मक कार्य, स्मृती आणि सामान्य कौशल्यांचे मापन केले जाते तसेच मेमरी क्लिनिक मधील मेमरी रिहॅब किट इत्यादी न्युरोसायकोलॉजीकल चाचण्यांचा वापर केला जातो. त्याचबरोबर सीटी स्कॅन, एमआरआय तसेच अल्झायमर व्यतिरिक्त इतर कारणांची शक्यता वाटत असल्यास रक्त तपासण्या सुध्दा केल्या जातात.
या आजारावर उपचार करताना बऱ्याचशा समस्या जाणवतात अल्झायमर हा आजार कधीही पूर्णपणे बरा होत नाही. फक्त विस्मरणाची गती कमी व्हावी, वर्तन दोष कमी व्हावेत यासाठी उपचार उपलब्ध आहेत त्यासाठी मानसोपचार तज्ञ डॉक्टरांच्या सुचनांचे पालन करणे गरजेचे आहे. याबरोबरच नियमित व्यायाम करावा, दैनंदिन डायरीचा वापर करावा. त्यामध्ये रोजची कामे लिहून ठेवावीत, वाचन करावे, विशेषत: पेपर, कादंबऱ्या, पुस्तके वाचावीत, शब्दकोडी सोडवावीत ज्यामुळे मेंदू सक्रिय राहतो. संतूलित आहार घ्यावा ज्यामध्ये प्रामुख्याने फळे, पालेभाज्या, प्रथिनयुक्त पदार्थ इत्यादीचा समावेश असावा.
आपल्या घरामध्ये वृध्द व्यक्ती असल्यास आणि त्यांच्या अल्झायमरची लक्षणे दिसत असल्यास कृपया त्याकडे दुर्लक्ष करु नका. त्या वृध्द व्यक्तीवर ओरडणे किंवा राग काढण्याऐवजी त्यांची मानसोपचार तज्ञांकडून तपासणी करुन औषधोपचार सुरु करावेत. लक्षात ठेवा रुग्णांना आधार देणे इतकेच काळजीवाहकांना (केअर टेकर) आधार देणे महत्वाचे आहे.
राष्ट्रीय मानसिक आरोग्य विभाग हा सेवा रुग्णालयात कार्यरत आहे. या विभागामार्फत तसचे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी 60 वर्षाच्या वरील सर्व लोकांची मिनी मेंटल स्टेट एक्झामिनेशन या चाचणीद्वारे स्मृतीची तपासणी करुन जर समस्या आढळली तर त्वरीत उपचार केले जातात.
राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील एप्रिल 2024 ते ऑगस्ट 2025 या वर्षामध्ये 60 वर्षावरील एकूण 37 हजार 799 इतक्या लोकांची डिमेंन्शिया, अल्झायमर आजाराची तासणी केली. त्यामध्ये 1 हजार 308 इतक्या लोकांना आजाराचे निदान झालेले आहे. या सर्व लोकांना मोफत औषध उपचार चालु आहेत.
आपल्यातील कूटूंब सदस्य किंवा नातेवाईकांना विस्मरणाची समस्या असल्यास जवळच्या शासकीय रुग्णालयात संपर्क करु शकतात तसेच समुपदेशन सेवेसाठी टेलिमानस हेल्पलाईन 14416 किंवा 1800894416 या नंबरवर 24X 7 या वेळेत संपर्क करु शकतात.
– डॉ. अर्पणा कुलकर्णी
मानसोपचार तज्ञ, सेवा रुग्णालय, कोल्हापूर