कोल्हापूर येथे रानभाजी महोत्सव : पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची राज्यस्तरीय आयोजनाची मागणी

कोल्हापूर : पावसाळ्यात डोंगरदऱ्यांमध्ये नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या रानभाज्यांचे आरोग्यासाठी असलेले महत्त्व ओळखून, या भाज्यांचा महोत्सव केवळ जिल्हास्तरावर मर्यादित न राहता तो राज्यस्तरावरही आयोजित केला जावा, अशी अपेक्षा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केली आहे. कोल्हापूर येथे आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
 
राजारामपुरीतील व्ही. टी. पाटील स्मृती भवनात आयोजित या कार्यक्रमात पालकमंत्री आबिटकर म्हणाले की, रानभाज्यांमध्ये पौष्टिक, सात्विक आणि आरोग्यवर्धक गुणधर्म मोठ्या प्रमाणावर असतात. मात्र, योग्य विपणनाअभावी (मार्केटिंग) या भाज्यांना हवी तशी प्रसिद्धी मिळत नाही. यावर उपाय म्हणून, हॉटेल व्यवसायाला या महोत्सवात कसे समाविष्ट करता येईल, या संदर्भात लवकरच जिल्ह्यातील हॉटेल असोसिएशनशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisements

यावेळी विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले की, हा महोत्सव कोल्हापूरसह सांगली आणि सातारा येथेही आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सुमारे दीडशे महिला बचत गटांनी सहभाग घेऊन साडेचारशेहून अधिक विविध खाद्यपदार्थ सादर केले.

Advertisements

स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव – या महोत्सवात आयोजित रानभाजी मांडणी स्पर्धेत निता पडवळ (प्रथम), कुडूत्री (राधानगरी) येथील महिला बचत गट (द्वितीय) आणि कातळी येथील कविता जाधव (तृतीय) यांना गौरविण्यात आले. तसेच, पाककृती स्पर्धेत राधानगरी येथील पूजा पाटील (प्रथम), हातकणंगले तालुक्यातील भादोले येथील शोभादेवी पाटील (द्वितीय) आणि कदमवाडी येथील तुळजाभवानी महिला बचत गटाच्या राणी कदम (तृतीय) यांनी बाजी मारली. या सर्वांना पालकमंत्र्यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

Advertisements

यावेळी ‘रानभाजी माहिती पुस्तिका’चे प्रकाशनही करण्यात आले. तसेच, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेल्या आणि म्हैसूर-बंगळूर येथील अभ्यास दौऱ्यातून परतलेल्या शेतकरी बांधवांनी पालकमंत्र्यांचा विशेष सत्कार केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पालकमंत्री आबिटकर यांनी विभागीय सहसंचालक बसवराज मास्तोळी आणि आत्माचे प्रकल्प संचालक जालिंदर पांगरे यांचे विशेष कौतुक केले. या महोत्सवात अनेक अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!