पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये विभागनिहाय भेटीसह घेतली आढावा बैठक
पुणे, दि. १६ – पुण्यातील ससून हॉस्पिटल हे गोरगरिबांच्या मोफत वैद्यकीय सेवेचे एक महत्त्वाचे सेवाकेंद्र आहे. या हॉस्पिटलला सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. दिल्लीतील एम्सच्या धर्तीवर या हॉस्पिटलमध्येही दर्जेदार आणि अद्ययावत वैद्यकीय सेवा मिळतील, असेही ते म्हणाले. हॉस्पिटलमध्ये आयोजित आढावा बैठकीत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. यावेळी आरोग्य संचालक डाॅ. अजय चंदनवाले, हॉस्पिटलच्या अधिष्ठाता डाॅ. आरती किनीकर यांच्यासह हॉस्पिटल व बी. जे. शासकीय मेडिकल कॉलेजचे अधिकारी, प्राध्यापक उपस्थित होते.
ससून हॉस्पिटलमध्ये दररोज अडीच ते तीन हजार रुग्ण बाह्यरुग्ण विभागांमध्ये उपचारासाठी येत असतात. एवढ्या प्रचंड रुग्णसंख्येमुळे अपुरे मनुष्यबळ व आर्थिक व्यवस्थापनावरही ताण येत असल्याचे अधिकाऱ्यानी निदर्शनास आणून दिले. मंत्री श्री. मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी बोलून हॉस्पिटलसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यासाठीही प्रयत्न करू, असे सांगितले. बालरुग्ण विभागाच्या नवजात बालकांसाठीच्या मानवी दूध पेढीचेही मंत्री. श्री. मुश्रीफ यांनी आवर्जून कौतुक केले.
बैठकीच्या आधी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी हॉस्पिटलच्या बाह्य रुग्ण विभागासह सर्वच विभागांना भेटी देऊन सविस्तर माहिती घेतली. बैठकीत माहितीच्या सादरीकरणामध्ये अधिष्ठाता डॉ. आरती किनीकर यांनी सांगितले की, महात्मा गांधी व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावरही ससून हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया व औषधोपचार झाल्याचा इतिहास आहे.
दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे कौतुक…..!
ससून हॉस्पिटलचा रुग्णांना द्यावयाच्या मोफत जेवणाचा अन्नपूर्णा विभाग दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्यावतीने मोफत चालविला जातो. या विभागातही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सविस्तर माहिती घेतली. याबद्दल आढावा बैठकीत ते म्हणाले, दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाला भक्तांकडून पवित्र आणि उदात्त भावनेतून देणगी दिली जाते. त्याच पवित्र भावनेतून रुग्णांना मोफत जेवणाच्या रूपाने ती परत केली जाते. मंडळाचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.
I like this weblog very much, Its a rattling nice spot to read and receive info.?