हसनसो मुश्रीफ व समरजीत घाटगे यांच्या हस्ते गैबी चौकातून प्रचाराचा नारळ फुटला !
कागल (प्रतिनिधी): कागल नगरपरिषद निवडणुकीच्या (२०२५-३०) मैदानात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि छत्रपती शाहू आघाडी या संयुक्त युतीने जोरदार एंट्री केली. वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसो मुश्रीफसाहेब आणि राजे समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकातून प्रचाराचा धडाका सुरू झाला.
श्रीमंत अखिलेशराजे घाटगे यांचीही या शक्तिप्रदर्शनाला प्रमुख उपस्थिती होती. ‘विकास आणि परिवर्तन’ हे घोषवाक्य घेऊन हे दोन्ही गट निवडणुकीत उतरले आहेत.

केडीसीसी बँकेचे संचालक भैय्यासाहेब माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, एम पी पाटील, बाळ घोरपडे, प्रकाश पाटील, बाबगोंडा पाटील, चंद्रकांत गवळी आणि नवल बोते यांसारख्या प्रमुख नेत्यांनी या वेळी व्यासपीठावर हजेरी लावली. युतीचे सर्व उमेदवार आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. गैबी चौकातून निघालेल्या या रॅलीने कागल शहरातील वातावरण पूर्णपणे निवडणुकीमय करून टाकले.