
मुरगूड ( शशी दरेकर ) – बाळ पहिल्यांदा भाषा शिकते ती म्हणजे आईच्या ओवीतून आणि म्हणूनच आपल्या बाळासाठी आईच्या पोटातून तिच्या ओठावर ओवी येते, ती कविता असते, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी गोविंद पाटील यांनी केले. ते मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या मराठी विभागांतर्गत आयोजित केलेल्या ‘ कविता सुचते अशी ‘ या विषयावरील व्याख्यानादरम्यान बोलत होते.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यप्रवण प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, कविता सुचण्यासाठी आपलं व्यक्तिमत्व समृद्ध असणं गरजेचे आहे त्यासाठी चौफेर वाचनाची आवश्यकता आहे, असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. त्यांनी आपल्या कवितांमधून ग्रामीण जीवनाच विदारक वास्तव मांडतानाच आजच्या तरुणपिढीला आरसाही दाखवला. यावेळी त्यांनी सादर केलेल्या कविवर्य कुसुमाग्रज आणि प्र.के.अत्रे यांच्या कवितांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तसेच त्यांच्या स्वरचित ‘कर्जात जन्मलो आम्ही ‘ व ‘बाप ‘ या कवितांनी उपस्थितांची मने हेलावून टाकली.
यावेळी कोणतीही भाषा जिवंत ठेवण्याचे काम कुठले ग्रंथ किंवा पुस्तके करत नाहीत तर ते काम बोली भाषा करत असते, असे मत त्यांनी मांडले. यावेळी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयामध्ये कार्यरत कार्यालयीन अधीक्षक श्री.महादेव भोई तसेच प्रयोगशाळा सहाय्यक श्री. सुमित जाधव, सुनिल कडाकणे यांनी मराठी विषयातून पदवी प्राप्त करून यशस्वी वाटचाल केलेबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे म्हणाले की, कवितेतून आनंद मिळतो, जीवनाचा मार्ग कळतो. कविता लिहायची असेल तर अनेक कवितासंग्रह तुम्ही वाचले पाहिजेत. भोवतालच्या परिस्थितीकडे डोळसपणे बघून त्यावर भाष्य करता आले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच मराठी भाषा रुजली पाहिजे, वाढली पाहिजे आणि टिकली पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ज्येष्ठ प्राध्यापक एम.आर. बेनके यांनी केले. प्रमुख वक्त्यांची ओळख प्रा.टी.एच.सातपुते यांनी करून दिली. सूत्रसंचलन प्रा. सुशांत पाटील यांनी तर आभार प्रा. संजय हेरवाडे यांनी मानले. यावेळी प्रा. विश्वनाथ चौगले, प्रा. डी. डी. खतकर, प्रा. विनायक माने, प्रा.डी.पी.साळुंखे, प्रा.दादासाहेब सरदेसाई, ले.प्रा.विनोद प्रधान, प्रा. गुरुनाथ सामंत, प्रा. शितल मोरबाळे,प्रा. मनिषा सावेकर, प्रा. दिपाली सामंत, प्रा.एम.ए.कुदळे, प्रा. पी. एस. गायकवाड यांसह इतर प्राध्यापक वृंद, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.