मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील ” मुरगूड नगरपरिषद ” मधील बगीचा विभागातील कर्मचारी श्री. भैरवनाथ कुंभार यांनी आतापर्यंत मुरगूड शहरामध्ये साडेचार हजारावर रोपट्यांचे संगोपन करुन व त्यांची योग्यप्रकारे निगा राखून रोपट्यांचे मोठ-मोठया वृक्षात रुपांतर झालेचे आपणास पहावयास मिळत आहे, त्यामुळेच मुरगूडनगरीच्या सौदर्यात भर पडली आहे. भैरवनाथ कुंभार यानीं गुलमोहोर , निलमोहर, वड, कॅशिओ, चाफा, बकुळी, करंजी, आपटा, कडूलिंब अशा अनेक प्रकारच्या रोपट्यानां वेळच्या-वेळी खतपाणी व योग्य प्रकारे निगा राखून संगोपन केल्याने आता ही झाडे मोठी झालेली आहेत.
अनेक ठिकाणी गुलमोहरांच्या झाडाला बहरलेली फुले पहाताना डोळ्यानां आल्हाददायी वाटते, पाटील कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, सूर्यवंशी कॉलनी, कापशी रोड, बाजारपेठ व इतरत्र अनेक ठिकाणी त्यानीं झाडांचे योग्य संगोपन केल्याने मोठ मोठी वृक्ष पहायला मिळत आहेत. मुरगूड नगरपरिषदेने याची दखल घेऊन ” चॅंपियन पुरस्कार ” देऊन त्यानां गौरवण्यात आले होते. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने आपण अनेक रोपटी लावून त्या रोपट्यांचे वृक्षात रुपांतर करण्याचा ध्यास आहे. अशा भावनां त्यानीं व्यक्त केल्या.