
मुरगुड(शशी दरेकर) : दि. २९ मार्च सायंकाळी ०६:४५ च्या सुमारास कळंबा-गारगोटी मार्गावर जीवनधारा हॉस्पिटलसमोर दुधगंगा उजव्या कालव्याच्या ब्रिजवर बोरवडे गावच्या हद्दीत एक दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्ती राजाराम पाटील (वय ५९, रा. एरंडोळ, ता. आजरा) हे त्यांच्या पत्नी सौ. विमल निवृत्ती पाटील (वय ४८) यांच्यासोबत होंडा कंपनीच्या (क्रमांक MH ०९ GD ६५२३) दुचाकीवरून कळंब्याहून गारगोटीकडे जात होते. त्याचवेळी, शरद महादेव माने (वय ३७, रा. कोरोची, ता. हातकणंगले) हे त्यांच्या ताब्यातील महिंद्रा ब्राझो २०१८ ट्रक (क्रमांक MH ४८ AY ३७६३) भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत होते.

दुचाकी जीवनधारा हॉस्पिटलसमोरील ब्रिजवर आली असता, ट्रकने दुचाकीला पाठीमागून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान, ट्रक चालकाने ट्रक डाव्या बाजूला घेतल्याने दुचाकीच्या हँडलला ट्रकचा धक्का लागला.
यामुळे निवृत्ती पाटील यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकी उजव्या बाजूला पडली. दुचाकीवर मागे बसलेल्या त्यांच्या पत्नी सौ. विमल या गाडीवरून खाली पडल्या आणि ट्रकच्या डाव्या बाजूच्या मागील तीन नंबरचे चाक त्यांच्या पाठीवरून छातीकडे गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या व जागीच त्यांचा मृत्यू झाला.
फिर्यादी निवृत्ती पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ट्रक चालक शरद माने यांच्या चुकीमुळे हा अपघात झाला असल्याचे नमूद केले आहे. मुरगुड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, भारतीय दंड संहिता कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटर वाहन कायद्याच्या कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती वाकळे करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.