मुरगूड( शशी दरेकर ) – कागल तालुक्यातील कुरुकली येथील मातंग समाज विकासापासून वंचित ठेवण्यात आला आहे.वेळोवेळी अर्ज विनंत्या करुन निवेदने देऊन देखील मूलभूत सेवा – सुविधांकडे ग्रामपंचायत प्रशासनाने जाणून बुजून दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र दिनानिमित्त कागल पंचायत औझसमितीच्या दारामध्ये कुरुकलीच्या मातंग समाजातर्फे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
कुरुकली येथील मातंग समाजामध्ये सध्या स्ट्रीटलाईट नाही.समाजात येणारा मुख्य रस्ता खराब,त्यावर आजतागायत डांबरच पडलेले नाही.गटर्स तुटलेल्या,तुंबलेल्या आहेत.सार्वजनिक पाण्याची टाकी धुळ खात पडलेली आहे.यासारख्या अन्य मूलभूत सेवा सुविधा ग्रामपंचायत प्रशासनाने पुरविलेल्या नाहीत.
गेली दहा वर्षे वारंवार हा समाज मागणी करत आहेत.ग्रा.पं.प्रशासनाकडे मागितलेली माहिती दिली जात नाही.प्रशासन या समाजाच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम करत आहे.त्यामुळे हतबल झालेल्या मातंग समाजाने आज सकाळी १० वाजलेपासून पंचायत समिती कागल यांच्या दारासमोर एक दिवशी लाक्षणिक उपोषण केले.
विविध सामाजिक संघटना,पत्रकार संघटना,सामाजिक कार्यकर्ते यांनी उपोषणस्थळी येवून पाठिंबा दर्शविला.विस्तार अधिकारी माळी यांनी कुरुकली ग्रामपंचायतीचे उपसरपंच गिरीष पाटील,जयवंत पाटील,व अन्य पदाधिकारी, ग्रामसेवक प्रविण पाटील यांचे सोबत उपोषणकर्त्यांची चर्चा घडून आणली.
यावेळी झालेल्या चर्चेत कुरुकली येथील मातंग समाजाच्या सर्व मागण्या मान्य करुन हे सर्व प्रश्न ३१ मे २०२३ पूर्वी निकालात काढण्याचे लेखी पत्र ग्रामपंचायतीने दिले. व उपोषण मागे घेण्याची विनंती केली.त्यानंतर उपोषण थांबवण्यात आले.
या उपोषणामध्ये प्रकाश तिराळे,युवराज तिराळे, गुलाब तिराळे, विकास चौगुले, अशोक तिराळे, प्रकाश तिराळे – मळगेकर,पाँल सोनुले, बचाराम तिराळे, प्रविण तिळवे,दत्तात्रय तिराळे,नंदकुमार तिराळे, कृष्णात तिराळे शुभम् तिराळे, विजय तिराळे,अवधूत तिराळे,गौरव तिराळे आदी उपस्थित होते.