कागल (विक्रांत कोरे): राजगुरुनगर येथील गोसावी समाजामधील दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृण खून केला. त्या नराधमावर कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी आणि पीडित कुटुंबास न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, याबाबतचे निवेदन अखिल भारतीय भटके समाज महासंघाच्यावतीने मंत्री हसन मुश्रीफ यांना कागल येथे त्यांच्या निवासस्थानी देण्यात आले.
पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे भटके गोसावी समाजातील दोन अल्पवयीन मुलीवर त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या परप्रांतीय नराधमांनी बुधवार दिनांक 25 डिसेंबर रोजी अत्याचार केले. त्या मुलींची निर्घृण हत्या केली. या घटनेचा निषेध करत अखिल भारतीय भटके समाज महासंघाचे पदाधिकारी तसेच कागल येथील गोसावी समाजाचे कार्यकर्त्यांनी आज मंत्री हसन मुश्रीफ यांना त्यांच्या निवासस्थानी निवेदन दिले. घडलेल्या घटने विरोधात निषेध व्यक्त करत निदर्शने केली.
यावेळी आकाश मकवाने, गुलाब गोसावी, संजय गोसावी, विलास गोसावी, सखाराम गोसावी, प्रकाश सावंत, भगवान गोसावी, सोमनाथ गोसावी, शेखर गोसावीसह गोसावी समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.