
मुरगूड (शशी दरेकर) : येथील लेखक-कवी वृक्षमित्र प्रविण सूर्यवंशी यांच्या ‘ झाडमाया कवितांची हिरवाई ‘ या काव्यसंग्रहास नुकताच तापी-पुर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. देवाची आळंदी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई आणि शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जि. जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या साहित्य संमेलनामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘झाडमाया कवितांची हिरवाई ‘ या काव्यसंग्रहामधून निसर्ग, पर्यावरण, प्रदूषण,त्याचे दुष्परिणाम, त्यावरील उपाय , आणि मानवाने निसर्गाप्रती कर्तव्य बुध्दीने करावयाचे कार्य आदी विषयांना सुंदर रीतीने श्री सुर्यवंशी यांनी शब्दबध्द केले असून पर्यावरण विषयक समाज जागृतीस हा काव्यसंग्रह अत्यंत यशस्वी ठरत आहे.
या काव्यसंग्रहास यापूर्वी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे सार्वजनिक ग्रंथालय उजळाईवाडी यांच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट वाड़मय निर्मिती ग्रंथ पुरस्कार २०१६ , याचबरोबर बालरंजन साहित्य मंच कोल्हापूर यांच्यावतीने दिला जाणारा पर्यावरण काव्य विभागातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार- २०१७ ला प्राप्त झाला आहे.
या वर्षीच्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्राप्ती बद्दल श्री सुर्यवंशी यांचेवर समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.