पुणे: ऑलिम्पिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित ‘नीरज चोप्रा’ या पुस्तकासाठी लेखक संजय दुधाणे यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा (मसाप) प्रतिष्ठेचा ग्रंथ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १२० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष ग्रंथकार आणि वार्षिक ग्रंथ पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान करण्यात आला.
दिल्लीच्या सुप्रसिद्ध हिंदी लेखिका आणि विचारवंत डॉ. सविता सिंह यांच्या हस्ते संजय दुधाणे यांना सन्मानपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. या सोहळ्याला अभिनेते अमोल पालेकर, ज्येष्ठ लेखक राजा दीक्षित, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. शिवाजीराव कदम, प्रा. मिलिंद जोशी यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते.

नीरज चोप्राचा प्रेरणादायी प्रवास शब्दबद्ध संजय दुधाणे यांनी नीरज चोप्राच्या जीवनातील एका शेतकऱ्याचा मुलगा ते ऑलिम्पिक स्पर्धेतील पदकविजेता हा प्रेरणादायी प्रवास आपल्या लेखणीतून मांडला आहे. नीरजच्या दुहेरी ऑलिम्पिक यशाचे प्रत्यक्ष साक्षीदार असल्याने दुधाणे यांनी मैदानातील वर्णने इतकी प्रभावीपणे केली आहेत की ती प्रत्यक्ष स्पर्धेचा अनुभव देतात. हे पुस्तक मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रकाशित झाले आहे. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेते नेमबाज स्वप्नील कुसाळे यांच्या हस्ते या चरित्राचे प्रकाशन झाले होते.

क्रीडा लेखनात दुधाणेंचे महत्त्वपूर्ण योगदान या पुरस्कारानंतर साहित्य क्षेत्रातून संजय दुधाणे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ज्येष्ठ साहित्यिक राजा दीक्षित यांनी दुधाणे यांचे अभिनंदन करताना म्हटले की, “संजय दुधाणे यांचा ऑलिम्पिकचा अभ्यास मोठा आहे. यामुळेच त्यांना ऑलिम्पिक विश्वकोश तयार करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. क्रीडा लेखन करणारे लेखक महाराष्ट्रात दुर्मिळ आहेत, त्यामुळे दुधाणे अभिनंदनास पात्र आहेत.”
संजय दुधाणे यांची आतापर्यंत २० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी लिहिलेल्या खाशाबा जाधव आणि मेजर ध्यानचंद यांच्या चरित्र पुस्तकांनाही शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत.
संजय दुधाणे यांची प्रमुख पुस्तके:
- चरित्रे: ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव, संत सीतामाई, संत गणोरेबाबा, मेजर ध्यानचंद, भारतरत्न सचिन तेंडुलकर, फ्लाइंग शीख मिल्खासिंग, सुपर मॉम मेरी कोम, गोल्डन बॉय नीरज चोप्रा.
- क्रीडाविषयक पुस्तके: आशियाई स्पर्धा, वाटचाल ऑलिम्पिकची, क्रीडापर्वणी, कथा ऑलिम्पिकच्या, ऑलिम्पिक अमृतानुभव, खेळांचा राजा-फुटबॉल, भारताचे ऑलिम्पिक, भारतीय खेळ, महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी.
आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे थेट वृत्तांकन: दुधाणे यांनी पॅरिस ऑलिम्पिक २०२४, टोकियो ऑलिम्पिक २०२१, रिओ ऑलिम्पिक २०१६, लंडन ऑलिम्पिक २०१२, आशियाई क्रीडा स्पर्धा, जागतिक हॉकी स्पर्धा, इंग्लंडमधील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे थेट वृत्तांकन केले आहे.