कोल्हापूर: रस्ते सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत १ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘रस्ता सुरक्षा अभियान’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत शहरात विविध उपक्रम राबवून नागरिकांना सुरक्षित प्रवासाचे आवाहन करण्यात आले.
२६ जानेवारी रोजी कोल्हापूर बायकिंग कम्युनिटीच्या सहकार्याने भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली, ज्याचा मुख्य उद्देश हेल्मेट वापराचे महत्त्व पटवून देणे हा होता. तसेच, जीवनधारा रक्तपेढीच्या मदतीने आयोजित रक्तदान शिबिरात ११४ नागरिकांनी सहभाग नोंदवला. रंकाळा परिसरात ‘रेडिओ मिर्ची’तर्फे प्रश्नमंजुषा घेऊन विजेत्यांना हेल्मेट वाटप करण्यात आले. प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी पालकांना आवाहन केले की, त्यांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये आणि सर्वांनी हेल्मेट व सीटबेल्टचा वापर अनिवार्य करावा.
