कोल्हापूर, दि. 19 : शनिवार दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी प्रधान सचिव माननीय श्री. विकास खारगेसाहेब यांनी पंडित बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळास सदिच्छा भेट दिली. यावेळी मंडळाच्या उपक्रमाबद्दल सर्वच बाबतीत सखोल माहिती घेऊन सविस्तर चर्चा केली.
या भेटी दरम्यान मंडळामार्फत आयोजित केल्या जात असलेल्या विविध सांगीतिक उपक्रमांची माहिती घेतली. शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार या मंडळाच्या उद्देशानुसार मंडळ कोणकोणते उपक्रम घेत असते याविषयी चर्चा केली.
मंडळामार्फत सुरू असलेल्या पं. बाळकृष्णबुवा संगीत विद्यालयाबाबत त्यांनी विशेष तपशीलवार विचारणा केली. परिसरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा, चर्चासत्रे, स्पर्धा अशा माध्यमातून मुलांच्या कलागुणांचा विकास व्हावा, त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे व चांगले दर्जेदार कलाकार तयार व्हावेत या विषयी योग्य असे मार्गदर्शन केले.
इचलकरंजी परिसरातील स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे. पंडित बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळातर्फे महोत्सव घेतले जावेत. गायन, वादन, नृत्य नाट्य या क्षेत्रातील सुप्रसिद्ध कलाकारांचे कार्यक्रम आयोजित केले जावेत. शास्त्रीय संगीताबरोबरच उपशास्त्रीय व सुगमसंगीताच्याही कार्यशाळा व्हाव्यात. विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी स्पर्धा घेतल्या जाव्यात, याविषयी चर्चा झाली.
याप्रसंगी श्री. उमेश कुलकर्णी, सौ. चित्कला कुलकर्णी, श्री. लक्ष्मण पाटील, श्री. अनील भिडे, श्री.गिरीश कुलकर्णी हे मंडळाचे पदाधिकारी व श्री. जितेंद्र कुलकर्णी, श्री. बापू तारदाळकर हे उपस्थित होते.