गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : उचगाव तलाठी कार्यालयातील एका गंभीर प्रकाराने खळबळ उडाली आहे. जिवंत असलेल्या एका दिव्यांग व्यक्तीला मृत दाखवून त्यांची संजय गांधी निराधार पेन्शन बंद करण्यात आली आहे. या प्रकरणी दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष उत्तम चौगुले यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
जुलै 2024 पासून उत्तम चौगुले यांची पेन्शन बंद झाली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. चौगुले यांनी सांगितले की, तलाठी कार्यालयाकडून मिळालेल्या यादीत त्यांच्या नावासमोर ‘मयत’ असा शेरा असल्याचे दिसून आले. यामुळे त्यांची पेन्शन बंद करण्यात आली.
या प्रकरणी चौगुले यांनी तलाठी कार्यालयाकडे हयातीचा दाखला देऊन पेन्शन सुरू करण्याची मागणी केली. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून त्यांना पेन्शन मिळाली नाही. त्यांना जुनी यादी दाखवली गेली, परंतु त्याचा कोणताही पुरावा देण्यात आला नाही.
या घटनेमुळे उचगाव पंचक्रोशीतील दिव्यांगांमध्ये असंतोष पसरला आहे. चौगुले यांनी या प्रकरणी अधिकृत माहिती देण्यास अधिकाऱ्यांचा नकार दिल्याचे सांगितले आणि जर योग्य कारवाई झाली नाही तर आंदोलन करण्याची चेतावनी दिली आहे.