
कोल्हापूर (जिमाका): 1971 च्या युध्दात प्राणांची आहुती देणाऱ्या शूर सैनिकांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी विजय दिवसाचे आयोजन करण्यात येते. या निमित्ताने 109 बटालीयन, मराठा लाईट इन्फंन्ट्री रेजिमेंट कोल्हापूर तर्फे 12 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर शहरात वेगवेगळ्या मार्गावरुन एकूण 50 किमीची ही रन असणार आहे, ज्यात कोणालाही कोणत्याही ठिकाणाहून कितीही अंतरासाठी सहभागी होता येणार आहे.
विजय दिवसाचे महत्व लक्षात घेवून तो नागरिकांच्या स्तरावर साजरा करण्यासाठी सर्व कोल्हापूरकरांना या रन मध्ये सहभागी होण्याचे आवाहन मराठा रेजिमेंट कोल्हापूर मार्फत करण्यात आले आहे. गुरुवार दि. 12 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता तावडे हॉटेल परिसरातून या अल्ट्रा रनला सुरुवात होणार आहे. कावळा नाका, धैर्यप्रसाद चौक, भगवा चौक, पोलीस अधीक्षक कार्यालय, महावीर कॉलेज, जिल्हाधिकारी कार्यालय, आरटीओ ऑफिस, सदर बझार चौक, कावळा नाका, आयोध्या टॉवर, शांती निकेतन चौक, एअर पोर्ट, पुन्हा परत येत शिवाजी विद्यापीठ व शांतीनिकेतन परिसरात उर्वरित 50 किमीची धाव पूर्ण करणार आहेत.
या अल्ट्रारन वेळी वाहतूक व्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्त असणार आहे. तसेच सहभागींसाठी ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.