मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांनी महायुती सरकारवर तीव्र शब्दांत टीका करत सरकारच्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. शेतकऱ्यांचे प्रश्न, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था आणि सरकार मधील कथित भ्रष्टाचार ही बहिष्काराची प्रमुख कारणे असल्याचे विरोधकांनी सांगितले.
अधिवेशनापूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत अंबादास दानवे यांच्यासह आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड आणि विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून त्यांच्या प्रश्नांप्रती असंवेदनशील असल्याचा आरोप केला.

अंबादास दानवे यांनी यावेळी सरकारमधील अनेक मंत्र्यांवर गुन्हेगारी आणि भ्रष्टाचारात गुंतल्याचा आरोप करत, त्यांना पोलिसांकडून संरक्षण मिळत असल्याचे म्हटले. भाजप आणि त्यांच्यासोबत असलेले ‘गद्दार’ महाराष्ट्राला कोणत्या दिशेने घेऊन जात आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी ‘शक्तीपीठ महामार्गा’वरून शेतकऱ्यांकडून होत असलेल्या विरोधावर चिंता व्यक्त केली. राज्यातील १२ जिल्ह्यांतील शेतकरी या महामार्गाला विरोध करत असून, यामुळे राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम होईल आणि याची खरंच गरज नाही, असे सांगत त्यांनी हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे जनतेचा विश्वास गमावल्याचेही विरोधकांनी म्हटले आहे.