मुरगूड (शशी दरेकर): कागल तालुक्यातील वडगाव येथे एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना उघडकीस आली असून, मुरगूड पोलिसांनी अवघ्या आठ तासात या गुन्ह्याची उकल करत दोन आरोपींना अटक केली आहे. शिवाजी बंडु शिंदे (वय ४७, रा. वडगाव, ता. कागल, जि. कोल्हापूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने शिवाजी शिंदे यांच्या डोक्यात गंभीर स्वरूपाची जखम करून त्यांची हत्या केली. मृतदेहाची ओळख पटू नये आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मारेकऱ्यांनी मृतदेह वडगाव ते माद्याळ जाणारे रस्त्यावर काशिनाका येथे रस्त्याच्या कडेला टाकून दिला होता.
शिवाजी शिंदे यांच्या आई शकुंतला बंडु शिंदे यांनी मुरगूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार, आज दि. ०९/०५/२०२५ रोजी मुरगूड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १६३/२०२५, बी एन एस कलम १०३ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधीक्षक श्री निकेश खाटमोडे पाटील, अपर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चु व करवीर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. सुजितकुमार क्षीरसागर, पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, स्थानिक गुन्हे शाखा यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास पथके तयार करण्याचे आदेश दिले.
मुरगूड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने कसून तपास करत अवघ्या आठ तासात या खुनाचा पर्दाफाश केला.

तपासात निष्पन्न झाले की, मयत शिवाजी शिंदे यांची पत्नी कांचन शिवाजी शिंदे हिचे तिचा चुलत दीर चंद्रकांत धोंडिबा शिंदे याच्याशी अनैतिक संबंध होते. याच कारणामुळे शिवाजी आणि कांचन यांच्यात वारंवार वाद होत होते. या रागातून कांचनने चंद्रकांतच्या मदतीने शिवाजीच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर लाकडी टोणा मारून त्याला गंभीर जखमी केले आणि त्याचा खून केला. त्यानंतर दोघांनी मिळून मृतदेह मोटरसायकलवरून वडगाव ते माद्याळ रोडवरील काशीनाका येथे टाकून त्याचा अपघात झाल्याचा बनाव केला.

या गुन्ह्याच्या तपासात सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांच्यासह सहायक फौजदार प्रशांत गोजारे, पोलीस अंमलदार बजरंग पाटील, सतीश वर्णे, रविंद्र जाधव, संदीप ढेकळे, संतोष भांदिगरे, राहुल देसाई, राजेंद्र चौगले, अरविंद सोलापुरे, रोहित खाडे आणि महिला पोलीस अंमलदार मिनाक्षी कांबळे यांनी सहभाग घेतला. स्थानिक गुन्हे शाखेच्या विजय इंगळे व इतर कर्मचाऱ्यांनीही मदत केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी करे हे करत आहेत.