महावितरणचा सणासुदीत ग्राहकांना ‘करंट’ झटका !

इंधन समायोजन शुल्कातून वीजदरात प्रति युनिट ९५ पैशांपर्यंत मोठी वाढ

राज्यातील कोट्यवधी वीज ग्राहकांना ऐन सणासुदीच्या तोंडावर महावितरणने (MSEDCL) वीज दरवाढीचा (Electricity Tariff Hike) मोठा धक्का दिला आहे. इंधन समायोजन शुल्क (Fuel Adjustment Charge – FAC) लागू करत महावितरणने प्रति युनिट ३५ पैशांपासून ते ९५ पैशांपर्यंत वाढ अमलात आणली आहे. १ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार ही वाढ पुढील आदेश येईपर्यंत कायम राहणार असून, ऑक्टोबर महिन्याच्या वीज बिलांमध्ये (Electricity Bill) ग्राहकांना ही दरवाढ स्पष्टपणे दिसून येणार आहे.

Advertisements

कोणाला किती ‘करंट’?

महावितरणने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, सप्टेंबर महिन्यात झालेल्या वीज वापरासाठी हे इंधन समायोजन शुल्क आकारले जाणार आहे. वापरानुसार दरवाढ खालीलप्रमाणे असेल:

Advertisements
श्रेणी (वीज वापर)प्रति युनिट इंधन समायोजन शुल्क (पैसे)
१ ते १०० युनिट३५ पैसे
१०१ ते ३०० युनिट६५ पैसे
३०१ ते ५०० युनिट८५ पैसे
५०१ पेक्षा जास्त युनिट९५ पैसे
बीपीएल ग्राहक१५ पैसे

या दरवाढीमुळे घरगुती ग्राहकांच्या बिलात दरमहा १५० ते ३०० रुपयांपर्यंत अतिरिक्त वाढ होण्याची शक्यता आहे, तर व्यापारी आणि उद्योगांवर याचा मोठा आर्थिक भार पडणार आहे.

Advertisements

इतर क्षेत्रांनाही फटका:

  • शेतकरी: कृषी ग्राहकांसाठी प्रति युनिट ४० पैसे अधिक शुल्क लागू करण्यात आले आहे.
  • इलेक्ट्रिक वाहने: इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनवरही प्रति युनिट ४५ पैसे अधिक शुल्क लादण्यात आले आहे.
  • मेट्रो/मोनोरेल: या सेवांसाठी देखील ४५ पैसे प्रति युनिट अधिक द्यावे लागणार आहेत.
  • व्यापारी व उद्योग: लघुदाब (LT) औद्योगिक कनेक्शनसाठी ४० ते ५० पैसे, तर उच्चदाब (HT) औद्योगिक कनेक्शनसाठी ५० पैसे प्रति युनिट इंधन समायोजन शुल्क आकारले जाईल.

महावितरणचे स्पष्टीकरण, नागरिकांचा संताप

महावितरणने वाढत्या कोळसा आणि इंधनाच्या खर्चामुळे तसेच वीज मागणी वाढल्यामुळे खुल्या बाजारातून महाग दराने वीज खरेदी करावी लागल्याने हा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

एकीकडे दिवाळीच्या तोंडावर महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांनी, ‘सणासुदीपूर्वीचा हा मोठा झटका’ असल्याचे म्हणत या दरवाढीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. उद्योजक आणि व्यापाऱ्यांनी देखील या दरवाढीमुळे उत्पादन खर्चात वाढ होणार असल्याने चिंता व्यक्त केली आहे. महागाईचा सामना करत असतानाच वीज बिलाचा हा अतिरिक्त भार ग्राहकांच्या खिशाला मोठा ‘करंट’ देणारा ठरणार आहे.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!