महाडिबीटीवरील प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढण्याचे आवाहन
कोल्हापूर, दि. १४ (जिमाका): अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विविध शैक्षणिक सुविधा व सवलती पुरवल्या जातात. यातीलच एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे केंद्र पुरस्कृत भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट शिष्यवृत्ती जमा होण्यासाठी बँक खाते आधारशी संलग्न करणे अनिवार्य आहे. या संदर्भात, विद्यार्थ्यांच्या आधार संबंधित अडचणींचे निराकरण करण्यासाठी https://base.npci.org.in/catalog/homescreen या प्रणालीचा वापर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून ६०% आणि राज्य सरकारकडून ४०% शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, केंद्र सरकारचा दुसरा हप्ता अजूनही अनेक विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. या संदर्भात, केंद्र हप्त्याची सद्यस्थिती विद्यार्थ्यांना https://pfms.nic.in/Home.aspx या लिंकद्वारे तपासता येईल. साळे यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांनुसार, केंद्र हिस्सा थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होतो. त्यामुळे, या संदर्भात येणाऱ्या तक्रारी केंद्र सरकारशी संबंधित आहेत. अशा परिस्थितीत, विद्यार्थी, पालक किंवा संघटनांनी थेट PG Portal (Centralised Public Grievance) (https:// pgportal.gov.in/Home/Lodge Grievance) वर तक्रार नोंदणी करावी.

याव्यतिरिक्त, साळे यांनी सर्व महाविद्यालयांना महाडिबीटी प्रणालीवर चालू शैक्षणिक वर्ष तसेच मागील वर्षातील प्रलंबित असलेले अर्ज तातडीने निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत.