पूर ओसरताच महावितरणची धडक मोहीम

राधानगरीतील ५ गावांचा वीजपुरवठा सुरळीत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यात दूधगंगा नदीला आलेल्या महापुरात गेल्या दोन दिवसांपासून खंडित झालेला वीजपुरवठा अखेर महावितरण आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अथक प्रयत्नांनी पूर्ववत करण्यात आला आहे. वाळवा उपकेंद्राखालील ठिकपुर्ली गावठाण फिडरवरील पाच गावांमध्ये वीज नव्हती. ही कामगिरी यशस्वी झाल्याने या गावांमध्ये पुन्हा एकदा उजेड परतला आहे.

Advertisements

या संदर्भात अधिक माहिती देताना महावितरणचे राधानगरी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता ओंकार डांगे यांनी सांगितले की, पुरामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती मिळताच आम्ही तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधला. त्यांच्या सहकार्याने एक विशेष मोहीम आखण्यात आली.

Advertisements

आज दुपारी ३ वाजता प्रत्यक्ष काम सुरू झाले. शाखा अभियंता सुहास शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली लाईनस्टाफचे सुरज पाटील, विकास पाटील, अक्षय चौगुले, विनोद आळवेकर व सागर शिंदे यांनी हे काम हाती घेतले. सर्वात मोठे आव्हान होते ते नदीपात्र ओलांडण्याचे. यासाठी बोटीचा वापर करण्यात आला. या कामात आपत्ती व्यवस्थापन पथकातील जवान कृष्णात सोरटे, शैलेश हांडे व प्रीतम पाटील यांनी बोटीद्वारे नदीपात्रातून जाण्यासाठी मोलाची मदत केली.

Advertisements

पुराच्या पाण्यात अडकलेल्या वीजवाहिन्यांवरून झाडांच्या फांद्या काढणे आणि पाण्याखाली गेलेल्या तारांची दुरुस्ती करणे अशी अतिशय जोखमीची आणि आव्हानात्मक कामे या कर्मचाऱ्यांनी केली. अनेक अडथळे पार करून अखेर फिडरचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले. या यशस्वी मोहिमेमुळे संबंधित गावातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!