मुरगूड ( शशी दरेकर ) : सुमारे ६५० कोटी रुपये ठेवी व दहा हजार शिक्षक सभासदांची अर्थवाहिनी असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील अग्रगण्य अशा कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी मुरगूडच्या शिवराज विद्यालय व ज्यूनि. कॉलेज येथील अविनाश महादेव चौगले यांची संचालक मंडळाच्या बैठकित बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडी शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी निलेश पाटील होते. निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण केली.

निवड प्रक्रियेचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कुरडे यांनी केले . कोल्हापूर येथील शाहूपुरी च्या मुख्य कार्यालयात झालेल्या या बैठकित चेअरमनपदासाठी अविनाश चौगले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी निलेश पाटील यांनी ही निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले . चेअरमन पदासाठी अविनाश चौगले यांचे नाव संचालक जितेंद्र म्हैशाळे यांनी सुचविले व त्यास श्रीकांत पाटील यांनी अनुमोदन दिले.
यावेळी व्हा चेअरमन ऋतुजा पाटील, संचालक बाळ डेळेकर, दिपक पाटील, सचिन शिंदे, राजाराम शिंदे, डॉ दत्तात्रय घुगरे,राजेंद्र रानमाळे , अनिल चव्हाण , मदन निकम, उत्तम पाटील, शरद तावदारे, श्रीकांत कदम,पांडुरंग हळदकर, प्रकाश कोकाटे,सुभाष खामकर, राजेंद्र पाटील , मनोहर पाटील, शितल हिरेमठ, एकनाथ आरडे आदीसह उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम कवडे उपस्थित होते.
निवडीनंतर नुतन चेअरमन यांचा सत्कार शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या हस्ते करण्यात आला . सभासदांनी ‘ स्वाभिमानी सहकार ‘ आघाडीवर विश्वास ठेवून चौथ्यांदा एकहाती सत्ता दिली . त्यामुळे सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेऊन दिलेल्या वचननाम्याची वचनपुर्ती टप्याटप्याने सुरु केली आहे.अशी ग्वाही आघाडीप्रमुख दादासाहेब लाड यांनी यावेळी दिली .
आघाडीचे नेते दादासाहेब लाड यांनी आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काटकसरीचा व आदर्शवत असा पारदर्शी कारभार केला जाईल असे प्रतिपादन सत्काराला उत्तर देताना चेअरमन अविनाश चौगले यांनी केले .
अविनाश चौगले यांच्या निवडीसाठी माजी खासदार संजय मंडलिक कार्याध्यक्ष ॲड.विरेंद्र मंडलिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
एकाच कुटुंबातील तिघांना चेअरमन होण्याचा मान
कोजिमाशि पतसंस्थेच्या स्थापनेपासून दीर्घकाळ के.डी.चौगले संस्थेचे चेअरमन होते. त्यांच्या पश्चात त्यांचे पुतणे मुरगुडचे नगरसेवक शिवाजीराव चौगले चेअरमन झाले. आणि आता अविनाश चौगले यांच्या रूपाने के.डी. चौगले यांचे पुतणे अविनाश चौगले यांना चेअरमनपद होण्याचा बहुमान मिळाला. एकाच कुटुंबातील तीन पिढ्यात कोजिमाशिचे चेअरमनपद मिळण्याची ही एकमेव घटना आहे.