कागल : कागल तालुकास्तरीय शासकीय बुद्धिबळ स्पर्धा २०२५-२६ नुकतीच ए. डी. माने इंटरनॅशनल स्कूल, कागल येथे पार पडली. सोमवार, २५ ऑगस्ट ते मंगळवार, २६ ऑगस्ट २०२५ या दोन दिवसांच्या कालावधीत आयोजित या स्पर्धेत तालुक्यातील २२५ हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपली बुद्धिमत्ता व कौशल्ये सादर केली.

स्पर्धेचे उद्घाटन कागल पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी सौ. सारिका कासोटे मॅडम आणि ए. डी. माने इंटरनॅशनल अकॅडमीचे प्राचार्य डॉ. विलास सासमिले सर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि बुद्धिबळासारख्या खेळाचे महत्त्व सांगितले. या स्पर्धेच्या आयोजनासाठी दि कागल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. बिपीन माने सर आणि वाय. डी. माने कॅम्पसच्या डायरेक्टर सौ. शिल्पा पाटील मॅडम यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

यावेळी कागल तालुका शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री. महेश शेडबाळे सर, तालुका समन्वयक श्री. संग्राम तोडकर सर, माजी अध्यक्ष श्री. के. बी. चौगुले सर, समन्वयक एकनाथ आरके सर, तानाजी पाटील सर तसेच तालुक्यातील विविध शाळांचे शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या. या स्पर्धेचे संयोजन सौ. अश्विनी गाडेकर मॅडम यांच्या नेतृत्वाखाली ए. डी. माने इंटरनॅशनल स्कूलच्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी केले. स्पर्धेतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि नियमांनुसार स्पर्धा पार पाडण्यासाठी श्री. बाबुराव पाटील व अनुराग पाटील यांनी पंचांची भूमिका चोख बजावली. ही स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली.