कागल तालुक्यात ‘महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाचा शुभारंभ; ७ मार्चपासून गावागावात शिबिरांचे आयोजन

कागल : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने सामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या महसूल विषयक समस्यांचे जागेवरच निराकरण करण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियान राबवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर आणि तहसील कार्यालय कागल यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाचा पहिला टप्पा फेब्रुवारी ते मे २०२६ या कालावधीत पार पडणार आहे.

Advertisements

या अभियानांतर्गत कागल तालुक्यातील विविध महसूल मंडळांमध्ये मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, त्याचे वेळापत्रक प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.

Advertisements

नागरिकांना मिळणाऱ्या प्रमुख सेवा:
या शिबिरांमध्ये महसूल प्रशासनाशी संबंधित अनेक प्रलंबित कामे तात्काळ निकाली काढली जाणार आहेत. यात प्रामुख्याने खालील सेवांचा समावेश असेल:

७/१२ उतारा व फेरफार नोंदी: वारस नोंदी मंजूर करणे, प्रलंबित फेरफार निकाली काढणे आणि चुका दुरुस्त करणे.

विविध दाखले: उत्पन्न, रहिवासी, जात आणि नॉन-क्रिमीलेअर दाखल्यांचे वितरण.

योजनांचा लाभ: सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे अर्ज भरून घेणे, पीएम किसान व ॲग्रीस्टॅक योजनांची माहिती.

जमीन सुधारणा: तुकडेबंदी सुधारणा, भोगवटादार वर्ग-२ जमिनी वर्ग-१ मध्ये रूपांतरित करणे आणि ई-मोजणी प्रक्रिया.

रस्ते मोहीम: पांदण रस्ते मोहीम आणि अतिक्रमण निर्मूलन.

प्रशासनाला अधिक लोकाभिमुख आणि गतिमान करण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या या अभियानाचा कागल तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार कार्यालय, कागल यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!