मडिलगे (जोतीराम पोवार) : वाघापूर तालुका भुदरगड येथे ज्योतिर्लिंग व विठ्ठल बिरदेव जागरात भाविकांनी गुलाल खोबरे उधळून मोठ्या उत्साहात व भक्ती भावात पार पडला पहाटे तीन वाजता भगवान डोणे यांचे चिरंजीव सिद्धर्थ डोणे यांनी नाथांची पहिली भाकणूक संपन्न केली तत्पूर्वी जयसिंग पाटील यांच्या घरातील मानाचा घट हलवल्यानंतर वालंग पार पडला नाथांच्या भाकणूकीचा संक्षिप्त घोषवारा पुढीलप्रमाणे…….राजकारणात भगवा डौलान मिरवल… दुधाचा भाव वाढत जाईल…. कोकणात कुरी मिरवल….. मूग. सोयाबीन उदंड पिकल..
ऊस पिकासाठी मोठी आंदोलने होतील…., गुळाचा भाव वाढत जाईल……..वचनाचा खरा अमृताचा झरा वेद गंगेच्या काठावर विठ्ठल बिरदेवान आशान टाकलया, मेघ उदंड हाय, बांदा आड बांध शिवा आड शीव, मेघ गैरहंगामी राहील, मेघाच्या पोटी आजार हाय, द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा हाय, त्याच्या माग अंधार म्होर अंधार पसरलाय, कोल्हापूरचं राजघराणे क्षत्रिय वंशाच हाय, धर्माची गादी हाय, धर्माच्या गादीला राम राम करा, पिंजऱ्यातील राघू भाषण करल, पहिला मोगरा धूपून जाईल, दुसरा मोगरा मध्यम राहील, तिसरा मोगरा राज्य करल,मिरवल मिरवल कुरी कोकणात, बांदा आड बांध शिवा आड शिव, रोहिणीचा पेरा मोत्याचा तुरा, रोहिणीची पेरणी त्याला हादग्याची पुरवणी राहील, पिवळ धान्य बहुत, राजमान धान्य उदंड पिकल, तांबडी रास मध्यम, पिवळी रास सुफळ राहील, मूग सोयाबीन कडधान्य उदंड पिकल,
सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळेल, दीड महिन्याचं इथून पुढे धान्य पिकल, पांढर धान्य उदंड पिकल, धान्य दारात वैरण कोण्यात वैरण सोन्याची होईल, ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल, गव्हाची पेंडी मध्यम पिकल, पिकल ते बांदा आड बांध शिवा आड शिव , धान्य दाण्याची वैरण काडीची चोरी मारी वाढेल,दिवसा ढवळ्या लूट चोऱ्यामाऱ्या होतील, भोळा शंकर व हालसिद्धनाथाचा धावा करशीला, कोरोना व्हायरस माझ्या पायाशी घेईन त्याला मी गडप करीन, सीमा प्रश्न राज्यकर्त्यांच्या चर्चेत राहील, कर्नाटक राज्यात मोठा गोंधळ माजेल, निपाणी भागात अतिरेकी लोक येतील, जाळपोळ फायरिंग होईल, कर्नाटक राज्यातील जलाशयाला मोठं भगदाड पडल, कर्नाटक राज्याचा चौथाई कोणा ओस पडल, उसाचं कांड व दुधाच्या भांड्यावरून गावोगावी राजकारणात मोठी कलाटणी लागल, गाई म्हशीचा भाव गगनाला भिडल, दुधाचा भाव वाढत राहील, नदीकाठची जमीन ओस पडेल, बारा वर्षाची मुलगी आई होईल, नीतीमत्तेचा खेळ बदललाय, उगवत्या सूर्याला संकट पडलय, मराठा सैनिक नाही मृत्यूला भिनार, छातीची ढाल करील,पाकिस्तान राष्ट्राशी लढत राहील, पाकिस्तान राष्ट्राचा चौथाई कोणा भारताच्या ताब्यात येईल, भारत मातेचा जयजयकार होईल, शेतकरी वर्ग रात्रंदिवस कष्ट करेल, दूध डेअरी चा मॅनेजर मलई खात राहील, दूध घालणारा शेतकरी कर्जात राहील, तंबाखूचा बंबाखू होईल,
उसाचा काऊस होईल, सडक वर पडल, ऊस पिकासाठी मोठी आंदोलने होतील, पाण्याचा कप विकत मिळेल, दागिने पैसे मनुष्याला घातक होतील, चांदीचा भाव वाढत राहील, राजकारणात मोठा सट्टा बाजार चालल, स्त्री वर्ग राजकारणात मोठी बाजी मारेल,सक्रिय राहील, राजकारणात भगवा डौलान मिरवल, इतर पक्ष चिंतेत राहतील, काँग्रेस पक्षात दोन गट पडून वाद लागल,गोरगरिबाला जगणं मुश्किल होईल,चालल गुंडांच राज्य चालल,बॉम्बस्फोट होतील,दिल्लीच्या गादीला धक्का पोहोचल, दिल्ली शहराचे मोठे नुकसान होईल, रेल्वेचे मोठे अपघात होतील, संप हरताळाचे पाळी आपल्या देशावर येईल, कामगार लोक घरात बसतील, बारा वर्षाचं बालपण, 24 वर्षाचा तरुण पण, पस्तीस वर्षाचं म्हातारपण येईल, माळाची नदी नदीचा माळ होईल, हिजड नाचतील, साताऱ्याच्या गादीवर फुल पडतील, शिवाजी महाराजांचा जयजयकार होईल, शिवाजी महाराज कोणाच्या तरी पोटी जन्माला येईल, सूर्य चंद्र एकत्र येऊन दोघांची टक्कर होईल, पृथ्वी गडप होईल, पृथ्वीचा करार संपत आलाय, एक औत चौघात होईल, मेघराजाची वाट बघशीला, उन्हाळ्याचा पावसाळा पावसाळ्याचा उन्हाळा होईल, ऋतुमान बदलत राहील.
यावेळी भगवान डोणे पुजारी, तुकाराम डोणे, संजय वाघमोडे, शिवाजीराव गुरव, विष्णुपंत गुरव, महेश गुरव, मधुकर गुरव, शिवप्रसाद गुरव, मोहन गुरव, शंकर गुरव, देवस्थान समिती अध्यक्ष अरविंद जठार, उपाध्यक्ष सदाशिवराव दाभोळे, पोलीस पाटील दत्तात्रय घाटगे, देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी, सरपंच दिलीप कुरडे कोतवाल बाबुराव आरडे, बिरदेव डोणे, मारुती कुंभार, चंद्रकांत काशीद यांच्यासह महाराष्ट्र कर्नाटकातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते