मुरगुड (शशी दरेकर) – “ऋणानुबंध ४ ” या घराचा उद्घाटन सोहळा इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला. गरीबाच्या घराची स्वप्नपूर्ती पाहण्यासाठी अख्खा गल्लीबोळ या वास्तुकसाठी हजर होता. ग्रंथरूपाने आहेर देऊन वास्तू उभारणीतील सर्व घटकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
खारीचा वाटा या सोशल मीडिया ग्रुपने मुरगूडातील दारिद्र्यात खितपत पडलेल्या सहा सदस्यांच्या कुटुंबासाठी घर बांधण्या करीता मदतीचे आवाहन केले. दोनच दिवसात तब्बल २ लाखाची रक्कम उपलब्ध झाली. पुरेसा निधी मिळाल्यामुळे मदतीचा ओघ थांबवून १९ ऑक्टोबरला पडके घर उलगडले आणि त्या ठिकाणी १० डिसेंबर रोजी सुंदर वास्तू साकारली.
अनेकांची मदत, देणगी आणि सहृदयतेतून साकारलेली ही वास्तू पाहताना घाटगे कुटुंबासह सारे जण आनंदाश्रुत न्हाऊन निघाले. पाहणारे देखील धन्य झाले. यावेळी मधुकर भोसले, युवराज डाफळे, गायत्री चौगुले,सुनील सोनार, विक्रांत भोपळे यांनी मनोगत मांडले. इंद्रजीत देशमुख यांनी शिवमच्या कामाचे कौतुक करून एक वेळ पुण्य कमी झाले तरी चालेल पण पुण्याची काम करण्याची भावना निर्माण होऊ दे असे आशीर्वचन दिले. सोमनाथ यरनाळकर यांनी प्रास्ताविक केले. तर निवेदन महादेव कानकेकर यांनी केले.