यमगेत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे शानदार उदघाट्न
मुरगूड (शशी दरेकर) – कोल्हापूर जिल्हा हा शिक्षणामध्ये अग्रेसर आहे. शासनाच्या वतीने शिक्षणाच्या मोठ्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. युपीएससी यशस्वी झालेल्या बिरदेव डोणे यांनी प्रतिकूल परिस्थितीत प्रामाणिक पणे शिक्षण घेऊन आपली परिस्थिती बदलली. शिक्षणामुळेच ते आजच्या पिढीचे आयडॉल झाले. त्यामुळे परिस्थिती बदलावयाची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
यमगे ता.कागल येथे बिरदेव डोणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विठ्ठल बिरदेव अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु झाले आहे. याच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार, कागल चे तहसीलदार अमरदीप वाकडे, सहा. पोलीस निरीक्षक शिवाजीराव करे प्रमुख उपस्थितीत होते.

यावेळी बोलताना अमोल येडगे म्हणाले ज्या पद्धतीने बिरदेव डोणे यशस्वी झाले त्यानंतर सर्व देशभरात डोणे यांच्या सह त्यांचे गाव तालुका आणि जिल्हा ही सर्वदूर पोहचला. त्यांच्या बातम्या आणि व्हिडीओ अनेक घरामध्ये मुलांना प्रेरणास्रोत म्हणून दाखवल्या. यश मिळण्यामध्ये ज्या गावचा वाटा आहे त्या गावाला परत काहीतरी द्यावे म्हणून डोणे यांनी अभ्यासिका आणि मार्गदर्शन केंद्र सुरु केले आहे. हाही उपक्रम कौतुकास्पद आहे. या अभ्यासिकेतून अनेक आयपीएस आयएएस अधिकारी घडावेत असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार यांनी पुस्तकामुळे जीवन बदलते हे माहित असल्याने डोणे यांनी बुके नको बुक दया हा उपक्रम राबवला.त्यातून सुंदर अभ्यासिका तयार झाली आहे.आम्ही जसे चोवीस तास जनतेसाठी उपलब्ध आहोत त्या प्रमाणे डोणे यांनी काम करावे तुम्ही गावाला विसरू नका म्हणजे गाव तुम्हाला विसरणार नाही असे ही त्यांनी सांगितले. स्वागत प्रास्ताविक बिरदेव डोणे यांनी केले.
यावेळी भगवान डोणे,सिद्धाप्पा डोणे, वासुदेव डोणे, बाळाबाई डोणे, नारायण पाटील, काकासो पाटील, प्रवीण पाटील, नरेश डोणे, अजित कांदळकर, देवानंद पाटील, सुधाकर पाटील, संदीप पाटील, सुनील पाटील, बिरू डोणे, शिवाजी डोणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांचे वेगळेपण
जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार हे दोघे ही ग्राम दैवत अंबाबाई मंदिरापासून कार्यक्रम स्थळी चालत आले.अभ्यासिका बाबत डोणे यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करून अजून कोणती पुस्तके हवी याबाबत ही माहिती दिली. त्यांनी ही आणलेली काही पुस्तके या केंद्राला सुपूर्त केली. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा घोंगडे काठी झाड देऊन सत्कार करण्यात आला. दोन्ही अधिकाऱ्यांच्या साधेपणाची गावाकऱ्यावर छाप पडली.