कागल : कागल पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गोरंबे गावामध्ये यंदाचा गणेशोत्सव ‘डॉल्बीमुक्त’ आणि ‘पर्यावरणपूरक’ साजरा करण्याचा निर्णय सर्व गणेश मंडळांनी घेतला आहे. या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्हा पोलीस आणि कगळ पोलीस ठाणे यांनी गोरंबे गावाचे विशेष अभिनंदन केले आहे.
गेल्या वर्षी गावात डॉल्बी लावल्याबद्दल १५ गणेश मंडळांवर ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी खटले दाखल करण्यात आले होते. याची दखल घेत यावर्षी गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी कगळ पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक लोहार, पोलीस पाटील रुपाली गायकवाड आणि गावचे सरपंच मालूबाई सुतार, तसेच अन्य मान्यवर जसे की दत्ता दंडवते, निशिकांत कांबळे, दिलीप सावंत, दत्ता पाटील आणि अमर सुतार यांनी गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, आणि कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन व सूचना दिल्या.

या सर्व सूचनांचे पालन करत गोरंबे गावातील सर्व गणेश मंडळांनी गणेशोत्सव ‘डॉल्बीमुक्त’ आणि ‘पर्यावरणपूरक’ साजरा करण्याचे ठरवले आहे. याबाबतची माहिती त्यांनी गावातील गणेशोत्सव बैठकीत दिली. तसेच, गावातील सूरज प्रकाश पाटील, चंद्रकांत सखाराम पाटील, रणजित हिंदुरा पिष्टे आणि रोहीत रखोंजी शिंदे यांचा ‘डॉल्बीमुक्त’ गणेशोत्सव साजरा करण्याच्या त्यांच्या भूमिकेबद्दल कगळ पोलीस ठाणे येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी कोल्हापूर जिल्हा पोलीस आणि कगळ पोलीस ठाणे यांनी सर्व गणेश मंडळांचे अभिनंदन केले. तसेच, इतर गावांनाही गोरंबे गावाप्रमाणेच गणेशोत्सव ‘डॉल्बीमुक्त’ आणि ‘पर्यावरणपूरक’ साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.