जिल्हा शीघ्र प्रतिसाद पथकाकडून तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी
कोल्हापूर, दि. 3 (जिमाका) : प्राथमिक आरोग्य केंद्र इस्फुर्ली, ता करवीर अंतर्गत परिते गावामध्ये हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान हरिनाम सप्ताहामध्ये एकूण १५० लोक सहभागी झाले होते. सप्ताहानंतर लोकांना जेवण देण्यात आले होते. त्यामध्ये भात, आमटी, कुर्मा व गुलकंद खीर देण्यात आली होती. सदरचे जेवण स्थानिक आचाऱ्यांमार्फत घरामध्ये केले होते.
दि. २ जानेवारी २०२४ रोजी पहाटे उलटी, जुलाब व तापाचे या लक्षणाचे रुग्ण आढळून आले. रुग्ण हरिनाम सप्ताहामध्ये सहभागी होते त्यांनी सप्ताहातील अन्नपदार्थ खाले होते त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राकडील वैद्यकीय अधिकारी व समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी परिते या गावी भेट दिली भेटीदरम्यान गावातील हरिनाम सप्ताहामध्ये सहभागी असलेल्यांपैकी 70 रुग्णांना उलटी, जुलाब व ताप लक्षणे आढळून आली. त्यांपैकी 3 रुग्ण सीपीआरकडे संदर्भित केले.22 रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र इस्फुर्ली, 7 रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र राशिवडे व उर्वरित 10 रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र राशिवडे येथे संदर्भित केले आहे व 3 रुग्ण खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून सर्व रुग्णांची तब्येत बरी आहे.
जिल्हास्तरारुन जिल्हा शीघ्र प्रतिसाद पथकाने तात्काळ गावास भेट दिली. पथकामध्ये अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी करवीर, कागल व राधानगरी, जिल्हा साथरोगतज्ज्ञ, जिल्हा साथरोग अधिकारी, आरोग्य सहायक व सेवक अधिकारी व कर्मचारी यांनी भेट देवून सुचना व मार्गदर्शन केले.
एकूण 70 रुग्णांची नोंद झाली असून 3 रुग्ण सीपीआरमध्ये संदर्भित केले असून 45 रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्राकडे उपचारासाठी वर्ग करण्यात आले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र इस्फुर्लीमार्फत परिते गावामध्ये आरोग्य विभागामार्फत दैनंदिन सर्वेक्षण करण्यात येत आहे. आढळून आलेल्या रुग्णांवर उपचार व संदर्भ सेवा देण्यात येत आहे. अन्नपदार्थांचे नमुने गोळा करण्यात आले असून ते प्रयोगशाळाकडे पाठविण्यात आले आहेत. शिळे अन्न न खाण्याबाबत व पिण्याचे पाणी उकळून गार करुन पिण्याबाबत तसेच उघड्यावरील अन्न खाण्याबाबत आरोग्य शिक्षण आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत माहिती देण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड यांनी दिली आहे.