मान्सूनचा वेग मंदावणार, कृषी विभागाचं आवाहन
मुंबई, दि. २५: यावर्षी मान्सूनने वेळेआधीच, म्हणजे २५ मे रोजी दक्षिण कोकणात धडक दिली असली तरी, आता त्याच्या प्रवासाची गती मंदावणार आहे. २७ मे पासून राज्यात हवामानात मोठे बदल अपेक्षित असून, कोरडे वातावरण आणि तापमानात वाढ दिसून येईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी, विशेषतः कोरडवाहू शेतकऱ्यांनी, पेरणीची घाई टाळावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
मान्सूनचा ब्रेक आणि कोरडं हवामान

सध्याच्या अंदाजानुसार, २७ मे नंतर राज्यातील हवामान हळूहळू कोरडे होईल आणि तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत कोकण वगळता इतर बहुतांश भागात कोरडं हवामान राहील आणि ही स्थिती किमान ५ जूनपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. याचा अर्थ, राज्यातील बहुतांश भागांत किमान ५ जूनपर्यंत तरी मान्सून दाखल होण्याची किंवा मान्सूनचा पाऊस पडण्याची शक्यता नाही. या दरम्यान देशातील इतर भागांतही मान्सूनचा प्रवास तात्पुरता थांबण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनो, अफवांना बळी पडू नका!
यावर्षी मान्सूनपूर्व वादळी पाऊस अनेक भागांत चांगला झाला आहे. त्यामुळे मान्सून लवकरच दाखल होईल, अशा अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र, कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की, अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून किंवा मान्सून लवकरच येणार या अपेक्षेने पेरणी आणि लागवडीची घाई करू नका. जर हवामान कोरडं होणार असताना पेरणीची घाई केली, तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, योग्य माहिती मिळाल्यावरच पेरणीचा निर्णय घ्या आणि आपल्या शेतीत योग्य ती काळजी घ्या.