पुणे : कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ESIC) सामाजिक सुरक्षा व्याप्ती वाढवण्यासाठी आणि नियोक्ते व कर्मचाऱ्यांच्या नोंदणीला प्रोत्साहन देण्यासाठी “SPREE 2025” (नियोक्ते आणि कर्मचाऱ्यांच्या नोंदणीला प्रोत्साहन देण्यासाठी योजना) ही नवीन योजना मंजूर केली आहे. हिमाचल प्रदेशातील शिमला येथे झालेल्या महामंडळाच्या १९६ व्या ESIC बैठकीत, कामगार व रोजगार तसेच युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली या योजनेला मंजुरी देण्यात आली.
SPREE 2025 म्हणजे काय?
SPREE 2025 ही ESIC द्वारे मंजूर केलेली एक विशेष योजना आहे, जी कर्मचारी राज्य विमा कायद्यांतर्गत सामाजिक सुरक्षेचा विस्तार करण्याच्या उद्देशाने राबवली जात आहे. ही योजना १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत सक्रिय असेल. या योजनेअंतर्गत, आतापर्यंत नोंदणी नसलेल्या नियोक्त्यांना आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना (कंत्राटी आणि तात्पुरते कामगार देखील समाविष्ट) कोणतीही तपासणी किंवा मागील थकबाकीची मागणी न करता एकदाच नोंदणी करण्याची संधी मिळणार आहे.

SPREE 2025 अंतर्गत प्रमुख वैशिष्ट्ये:
- डिजिटल नोंदणी: नियोक्ते त्यांच्या आस्थापनांची आणि कर्मचाऱ्यांची डिजिटल नोंदणी ESIC पोर्टल, श्रम सुविधा पोर्टल आणि MCS पोर्टलवरून करू शकतील.
- नोंदणीची वैधता: नोंदणी ही नियोक्त्याने जाहीर केलेल्या तारखेपासून वैध मानली जाईल.
- मागील जबाबदाऱ्यांमधून सूट: नोंदणीपूर्व कालावधीसाठी कोणतेही योगदान किंवा लाभ लागू होणार नाहीत. तसेच, नोंदणीपूर्व कालावधीसाठी कोणतीही तपासणी किंवा मागील कागदपत्रांची मागणी केली जाणार नाही.
- स्वयंप्रेरित अनुपालन: ही योजना स्वयंप्रेरित अनुपालनाला प्रोत्साहन देते, कारण मागील दंड व थकबाकीबाबतची भीती न ठेवता नोंदणीची प्रक्रिया सुलभ केली आहे.
योजनेचे महत्त्व:
SPREE योजनेपूर्वी, निर्धारित वेळेत नोंदणी न केल्यास कायदेशीर कारवाई आणि मागील थकबाकीची मागणी केली जात होती. परंतु, आता SPREE 2025 हे अडथळे दूर करून, ESIC योजनेच्या कक्षेबाहेर असलेल्या कामगारांना आणि आस्थापनांना कक्षेत आणते, जेणेकरून त्यांना सामाजिक संरक्षण मिळू शकेल. ही योजना ESIC कडून सामाजिक सुरक्षा सर्वसमावेशक आणि सुलभरित्या करण्याच्या दिशेने एक प्रगतीशील पाऊल आहे. यामुळे नोंदणी सुलभ होऊन आणि मागील जबाबदाऱ्यांपासून सूट देऊन, ही योजना नियोक्त्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यास प्रोत्साहित करते आणि विशेषतः कंत्राटी कामगारांना ESIC कायद्यांतर्गत आरोग्य आणि सामाजिक लाभ मिळवण्यासाठी मदत करते.
ESIC ने सामाजिक सुरक्षा व्याप्ती करण्याचा आपला संकल्प दृढ केला आहे आणि भारतात एक कल्याण-केंद्रित श्रम व्यवस्था उभी करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. SPREE 2025 हे त्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.