स्वच्छता मोहीम, नालेसफाई आणि धोकादायक बांधकामांवर विशेष लक्ष
कागल: कागल नगरपरिषदेने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत मान्सूनपूर्व कामांसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. अजय पाटणकर यांच्या आदेशानुसार पावसाळ्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.
शहरात सध्या युद्ध पातळीवर स्वच्छता मोहीम सुरू आहे. यामध्ये ठिकठिकाणी असलेले उकिरडे, कचऱ्याचे ढीग हटवणे, नालेसफाई आणि स्वच्छता या कामांचा समावेश आहे. शहरातील सर्व होर्डिंग्ज काढण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, धोकादायक झाडांच्या फांद्या काढण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. तसेच, धोकादायक इमारतींना तात्काळ नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


‘प्रशासन आपल्या दारी’ या अभियानांतर्गत, नागरिकांना मान्सूनपूर्व काळात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रभागनिहाय स्वच्छता आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार नालेसफाई, कचरा उठाव, रस्ते सफाई तसेच रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळा ठरणारे बांधकाम साहित्य हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे.
मुख्याधिकारी श्री. अजय पाटणकर हे दर आठवड्याला विभागप्रमुख आणि कर्मचाऱ्यांसोबत बैठका घेऊन नागरिकांकडून आलेल्या तक्रारींचे निवारण होत आहे की नाही याचा आढावा घेत आहेत. कामांचा पाठपुरावा सातत्याने केला जात आहे. शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशीही शहरात मान्सूनपूर्व तयारीची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

मान्सूनपूर्व काळात आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुख्याधिकारी यांनी पालिकेच्या आरोग्य, पाणीपुरवठा, बांधकाम, कर विभाग यासह इतर विभागांना कामे नेमून दिली असून, त्यांची जबाबदारी निश्चित केली आहे. आरोग्य विभागाचे प्रमुख श्री. नितीन कांबळे (आरोग्य निरीक्षक), श्री. दस्तगीर पखाली (आरोग्य निरीक्षक) आणि श्री. बादल कांबळे (स्वच्छता मुकादम) यांना शहरातील गटार स्वच्छता, नाले सफाई आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे नियोजन देण्यात आले आहे.