मुख्याधिकारी कार्तिकेयन एस., बीडीओ बोंगे आणि डॉ. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कागल पंचायत समिती आणि आरोग्य विभागाने रचला यशाचा नवा अध्याय
कागल / प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवस प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत पुणे विभागातयेणाऱ्या ५३ तालुक्यांमधून कागल पंचायत समितीने व तालुका आरोग्य विभागाने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
दि. ७ जानेवारी ते ३० एप्रिल या दरम्यान हा उपक्रम राबविण्यात आला. विभाग स्तरावरील निवड प्रक्रियेत पंचायत समिती गटामध्ये कागल पंचायत समितीला व तालुका वैद्यकीय अधिकारी गटामध्ये कागल तालुका आरोग्य कार्यालयाला हे यश मिळाले.

यामध्ये विविध उपक्रम राबवून नागरिकांचे जीवनमान सुकर करण्याच्या दृष्टीने काम झाले. त्यात कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांमधील पंचायत समित्यांचा सक्रिय सहभाग होता.
शंभर दिवसांच्या अभियानांतर्गत कागल पंचायत समितीने आपले संकेतस्थळ तयार केले आहे, वॉटर बेल, बचत गटांना यात्रांमध्ये स्टॉल लावण्यासाठी विशेष प्रोत्साहन, अभ्यंगतांसाठी फ्री वायफाय स्टेशन असे नाविन्यपूर्ण उपक्रम ही राबवण्यात आले आहेत.
कार्यालयीन स्वच्छता, अभिलेख वर्गीकरण कामकाज, निर्लेखन, ई-ऑफिस कामकाज, जिल्हा परिषद सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे,कार्यालयीन कामकाजासाठी प्रसन्न वातावरण असण्याच्या दृष्टीने, कार्यालयाचे सौंदर्याकरण करण्यात आले आहे.
तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. फारुख देसाई यांनी तालुका आरोग्य विभागामार्फत तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून विविध योजना व नाविन्यपूर्ण उपक्रम यांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जोशी , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) मनीषा देसाई यांचे या १०० दिवस प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमात मोलाचे मार्गदर्शन लाभले.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांनी हे यश पंचायत समितीच्या सर्व कार्यालय प्रमुख व अधिकारी कर्मचारी यांचे असल्याचे सांगून त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.