
स्वखर्चातून केले शिवपुतळ्याचे पॉलिश व रंगकाम; शिवभक्तांकडून सत्कार
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड नगरपरिषदेच्या प्रांगणात तीन वर्षापूर्वी उभारलेल्या अश्वारूढ पुतळ्याचे पॉलिश, रंगकाम व डागडूजीचा संपूर्ण खर्च स्वतः करत मंडलिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. वीरेंद्र मंडलिक यांनी शिवभक्तांना दिलेली वचनपूर्ती केली.
अलोट जनसागराच्या साक्षीने चैतन्याने भारलेल्या शिवमय वातावरणात … तरूणाईच्या सळसळत्या शिवभक्तीच्या जयघोषात …डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या दिमाखदार रोषणाईत मुरगूड नगरपालिकेच्या प्रांगणात मंडलिक युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष वीरेंद्र मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली व लोकसहभागातून सुमारे पावणेदोन टन वजनाच्या पंचधातू पासून बनवलेल्या शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा १५ मे २०२२ रोजी राज्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला होता.
तीन वर्षानंतर ऊन , वारा, पाऊस आणि तापमान यामुळे पुतळ्यावर हिरवा गंज चढला होता. पुतळ्याचे सौंदर्य कायम टिकविण्यासाठी दर तीन वर्षातून रंगकामाची आवश्यकता असते.त्यानुसार मंडलिक प्रतिष्ठानने पुतळ्याचे रंगकाम करावे अशी मागणी शिवभक्त व शिवप्रेमींनी ॲड. मंडलिक यांच्याकडे केली होती.

मुरगूड नगरपरिषदेने या पुतळ्याच्या चबुतऱ्याचे बांधकाम केले आले.पण पुतळ्याची देखभाल व पावित्र राखण्याची जबाबदारी मंडलिक युवा प्रतिष्ठानने घेतली आहे. तसे प्रतिज्ञापत्र प्रतिष्ठानने मुरगूड नगरपरिषदेस दिले आहे.दर तीन वर्षांनी पुतळ्याची डागडूजी पॉलिश व रंगकामाची जबाबदारीही प्रतिष्ठानने घेतली आहे. पुतळ्यासाठी वापरलेल्या पंचधातूपैकी तांबे धातूचा पाण्याचा संपर्क आल्याने हिरवट रंगाच्या पावडरचा थर जमा झाल्याने पुतळ्याचे पॉलिश व रंगकाम करावे असा अहवाल साताऱ्याचे या विषयातील तज्ञ आरिफ तांबोळी व अश्वारूढ पुतळ्याच्या मुख्य शिल्पकार सीमा खेडकर शिर्के( पुणे ) यांनी दिला होता. तर शिवभक्तांनी तशीच मागणी केली होती.
त्यास अनुसरून ॲड. मंडलिक यांनी पालिका प्रशासनासोबत बैठक घेऊन शिवपुतळ्याची देखभाल,दुरुस्ती व रंगकाम करण्याची जबाबदारी घेत स्वखर्चातून संपूर्ण पुतळ्याचे रंगकाम व दुरुस्ती केली. त्यामुळे पुतळ्याचे सौंदर्य लखलखीत झाले आहे.
ॲड. मंडलिक यांनी शिवपुतळा परिसरात भेट देऊन रंगकामाची पाहणी केली. यावेळी शिवप्रेमी व शिवभक्तांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल ॲड. मंडलिक यांचा नागरी सत्कार केला.
सर्व जबाबदारी स्विकारली ..
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे दैवत आहेत.मंडलिक युवा प्रतिष्ठान, नगरपालिका आणि लोक सहभागातून आम्ही पुतळा उभारला. या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे रंगकाम तंज्ञाच्या शिफारशीतून दर तीन वर्षांनी होईल आणि ते सतत होत राहील. याशिवाय परिसराचे सुशोभीकरण, दुरुस्ती व देखभाल याचीही कायमस्वरूपी जबाबदारी मंडलिक युवा प्रतिष्ठान घेत आहे.
ॲड. विरेंद्र मंडलिक
अध्यक्ष मंडलिक युवा प्रतिष्ठान