5 लाख 70 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याकडून लंपास, पोलिसांसमोर आव्हान
कागल/प्रतिनिधी : कागल मध्ये भर दिवसा घरफोडी झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. सुमारे ५ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने घेऊन अज्ञात चोरट्यानी पोबारा केला आहे .भर दिवसा झालेल्या या धक्कादायक प्रकाराने पोलिसांसमोर आव्हान उभे टाकले आहे. घरफोडीचा प्रकार तारीख 10 रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे. रात्री उशिराने कागल पोलिसांनी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सचिन अशोक पाटील, राहणार – मुळगाव बारवाड, तालुका – निपाणी, जिल्हा – बेळगाव सध्या राहणार माळी गल्ली, कागल यांच्या घरी घरफोडीचा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सचिन पाटील व त्यांच्या पत्नी हे दोघेजण यळगुड तालुका हातकणंगले येथे कामावर गेले होते.

दरम्यान आज्ञात चोरट्यानी घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. कपाटातील कपडे व इतर साहित्य विस्कटून टाकले. त्यातील सोन्याचे व चांदीचे दागिने घेऊन अज्ञात चोरट्यानी पोबारा केला.

चोरीस गेलेले दागिने असे-रुपये २ लाख ४०हजार किमतीचे ३०ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे गंठण, रुपये १ लाख २० हजार किमतीचे १५ ग्रॅम वजनाचे एक सोन्याचा नेकलेस, रुपये २४हजार किमतीचे ३ ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे टॉप्स, रुपये २४ हजार किमतीचे ३ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानवेल, रुपये १ लाख ४४ हजार किमतीचे १८ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या ६ अंगठ्या, रुपये १६ हजार किमतीचे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे १ मनी मंगळसूत्र, रुपये १५ हजार किमतीचे ३ ग्राम वजनाचे २ चांदीचे पैंजण, रुपये ५०० किमतीची चांदीची ४ जोडवी, असा एकूण रुपये पाच लाख 70 हजार किमतीचे सोन्या-चांदीची दागिने घेऊन आज्ञात चोरट्यानी पलायन केले आहे. पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे.
कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश तावरे हे पुढील तपास करीत आहेत.