
गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : काही दिवसांपूर्वी गोकुळ शिरगाव एमआयडीसी मध्ये हनुमान इंजिनिअरिंग 25 लाखाचा घोटाळा झाला होता. काही दिवस झाले त्या मागोमागे कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील आर्या स्टील रोलिंग इंडिया लिमिटेड या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी कंपनीला 63 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अमरजित अशोक लाड (वय 41, रा. लक्ष्मीनारायण संकुल, ताराबाई पार्क, कोल्हापूर, विकास विलास सुर्यवंशी (वय 36, रा. नदी किनारा, सिद्धनेर्ली, कागल),सचिन गणपती मेंगाणे (वय 33, रा. शेळेवाडी, करवीर, कोल्हापूर) अशी आहेत.आरोपी अमरजित लाड हा कंपनीत मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह मॅनेजर म्हणून काम करत होता. त्याने कंपनीचे व्यवस्थापक आणि मालक यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने आरोपी विकास सुर्यवंशी आणि सचिन मेंगाणे यांच्याशी संगनमत करून बनावट ऑर्डरच्या आधारे कंपनीचा 63 लाख रुपयांचा माल त्यांना विकला.
हा प्रकार 2022 ते 18 ऑगस्ट 2024 या कालावधीत घडला.या प्रकरणी मनीष शामराव बामणे (वय 46) यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीनही आरोपींना अटक केली आहे. आरोपींविरोधात भा.दं.वि. कलम 420 (फसवणूक), 406 (विश्वासघात) आणि 34 (समान उद्देश) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अमरजित लाड याच्यावर यापूर्वीही शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसा कडून मिळाली आहे. या घटनेचा अधिक तपास गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक पाटील करत आहेत.