कोल्हापूरच्या विकासाला ‘चित्रनगरी’मुळे चालना मिळेल का?
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘चित्रनगरी: कोल्हापूरच्या विकासाचे महाद्वार’ या चर्चासत्राचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते झाले. हॉटेल सयाजी येथे दुपारी १२ वाजता हा कार्यक्रम झाला. कोल्हापूर चित्रनगरीच्या माध्यमातून शहराच्या विकासाला कशा प्रकारे चालना मिळू शकते, यावर या चर्चासत्रात विचारमंथन करण्यात आले.
या चर्चासत्रात खासदार धनंजय महाडिक, खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, आमदार अमल महाडिक, आमदार सत्यजित देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच, अभिनेते किशोर कदम, अभिनेते सागर तळाशीकर, ईटीव्हीचे संस्थापक सदस्य डॉ. उदय नारकर, चित्रपट अभ्यासक डॉ. कविता गगराणी आणि दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला.

कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाचे कार्यकारी संचालक बिभीषण चवरे यांनी कला क्षेत्रातील सर्वांना या चर्चासत्रात उपस्थित राहण्याचे आवाहन केले. या चर्चासत्राचे आयोजन हॉटेल सयाजी येथील मेघ-मल्हार सभागृहात करण्यात आले होते.