मुरगूड (शशी दरेकर) : मुरगुड ता. कागल येथील जिल्हा परिषदेची शिवाजी विद्यामंदिर मुरगुड नं.२ या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी या कार्यक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समिती छ.शिवाजी मुरगुड यांच्यावतीने आयोजित केले होते. प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी डॉ.जी बी कमळकर हे होते.
यावेळी प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये कागल तालुक्याचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल इयत्ता 4थी चे वर्ग शिक्षक श्री. अनिल बोटे यांचा सन्मानचिन्ह देऊन डॉ. कमळकर व सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.जी.बी कमळकर यांनी शाळेचे कौतुक करताना सांगितले की काही वर्षांपूर्वी या शाळेचा दर्जा खालावला होता मात्र आत्ताच्या सर्व शिक्षकांनी पुन्हा एकदा या शाळेला नावारूपास आणले आहे.त्यामुळे ११० पटाची शाळा ही १५२ पाटावर गेली आहे.त्यामुळे शाळेला १ मुख्याध्यापक व २ अध्यापक मिळणार आहेत.
येथील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा हा खाजगी शाळांपेक्षा कितीतरी पटीने सरस आहे. तसेच मुरगुड मधील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या दर्जेदार आहेत. त्यामुळे सर्वांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घ्यावा असे आवाहनही त्यानीं केले.
कार्यक्रमात या शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये जे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत अशा एकूण ६९ विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. मुरगुड येथील रणजीत भारमल यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थी व पालकांसाठी अल्पोपहाराची सोय केली होती.
कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निशांत जाधव उपाध्यक्ष अश्विनी गुरव, अमर चौगले, विजय मेंडके, विशाल रामशे, रणजित डोंगळे, जीवन भोसले, रेणू सातवेकर, सीमा उपलाने, मेघा डेळेकर, जयश्री मोरबाळे, अध्यापक अनिल बोटे, सविता धबधबे, अनिता पाटील, श्रीकांत गायकवाड, संदीप शिंदे, संतोष मेळवंकी, मधुकर झळके, सारिका रामशे, सर्व पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक श्री मकरंद कोळी यांनी तर सूत्रसंचालन दशरथ सुतार व आभार मुख्याध्यापक प्रवीण अंगज यांनी मानले.