सोने, चांदी दागिन्यांसह ३ लाख ३३ हजार रुपयांसह अज्ञात चोरट्यानी मारला डल्ला
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सूर्यवंशी कॉलनीतील बंद दरवाजाचा कडी कोयंडा तोडून तिजोरीचे कुलूप उचकटून सोने-चांदी आणि रोकड अशा तब्बल ३ लाख ३३ हजार रुपयांच्या ऐवजावर अज्ञात चोरट्यानी डल्ला मारला. याबाबत रेखा टिपुगडे यांनी आज मुरगूड पोलीस ठाण्यात चोरी ची फिर्याद नोंदवली.

घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रेखा सखाराम टिपुगडे (वय ६० )या सूर्यवंशी कॉलनीमध्ये स्वमालकीच्या घरी राहतात. दि. २६ ते २८ दरम्यान तीन दिवस घराला कुलूप लावून त्या मडिलगे येथील मुलगीकडे गेल्या होत्या. या काळात अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला.


मुरगूड : चोरटयांनी टिपुगडे यांच्या घरातील तिजोरीतील विस्कटलेली कपडे
देवघरातील तिजोरीचा दरवाजा उघडून लॉकर उचकटून काढले . आणि अडीच तोळे वजनाची लॉकेटसह असलेली चेन, एक तोळे वजनाची गंठण लॉकेट, अडीच तोळे वजनाच्या लहान-मोठ्या आकाराच्या सोन्याच्या पिळाच्या अंगठ्या, लहान बाळासाठी असलेल्या अर्धा तोळे वजनाच्या छोट्या आकाराच्या १५ अंगठ्या, चांदीचे ताट १, निरंजन २, करंडा १ ,वाटी १ आणि पाच हजार रुपये रोख रक्कम असा ३ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी स गेला. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी करे करीत आहेत.