कागल (दिनांक २० ऑगस्ट, बुधवार) – सिद्धनेर्ली गावाजवळील दुधगंगा नदीच्या पुलावर पाणी आल्याने, कागल-मुरगूड रस्त्यावरील वाहतूक आज संध्याकाळी ६ वाजल्यापासून पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पुलाच्या दोन्ही बाजूंनी बॅरिकेट्स लावले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. आज संध्याकाळी नदीचे पाणी सिद्धनेर्ली येथील पुलावर आले. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने त्वरित कार्यवाही करत पूल वाहतुकीसाठी बंद केला.

यामुळे कागलहून मुरगूडकडे किंवा मुरगूडहून कागलकडे जाणाऱ्या प्रवाशांना आता पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. पाण्याचा प्रवाह कमी होईपर्यंत आणि पूल सुरक्षित असल्याची खात्री होईपर्यंत हा रस्ता बंद राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. वाहनचालकांनी आणि नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.