कोल्हापूर(जिमाका): वेळ सकाळी 11 वाजताची.. एचपी ऑइल गॅसच्या कागल फाईव्ह स्टार एमआयडीसी येथील मदर स्टेशन येथे एक निनावी फोन आला.. फोनवरुन एका अज्ञात व्यक्तीने गॅस स्टेशनवर बॉम्ब ठेवला असून घातपात घडवणार आहोत, अशी धमकी आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एचपी ऑइल गॅसच्या कंट्रोल रुमने त्वरित एचपी ऑइल गॅसचे प्रमुख अधिकारी बाबासाहेब सोनवणे यांना या घटनेची कल्पना दिली.
श्री. सोनवणे यांनी संबंधित घटनेची माहिती तातडीने पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाला दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ हे टीम सह घटनास्थळी दाखल झाले. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून अगदी जलद गतीने गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशन टीम, कागल एमआयडीसी फायर ब्रिगेड टीमला पाचारण केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तसेच एचपी ऑइल गॅस कोल्हापूर प्रमुख व लोकल पोलीस स्टेशन यांनी सहकार्याने संपूर्ण परिसर रिकामा करुन परिस्थितीचा ताबा घेतला.
काही वेळातच या ठिकाणी बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्कॉड ( बॉम्ब शोध व निकामी पथक) दाखल झाले. या पथकाने त्वरित आपली कारवाई सुरू करून आधुनिक साधनांसह तसेच श्वानासह संपूर्ण परिसराची झडती घेतली. दरम्यान पथकास एक बॉम्बसदृश संशयित वस्तू प्राप्त झाली. पथकाने त्वरित ही वस्तू पाहणी करून अत्याधुनिक साधनांनी त्याची तपासणी केली. तपासणी दरम्यान यात कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू अथवा स्फोटके नसल्याचे निदर्शनास आले. संपूर्ण खात्री नंतर या पथकाने सर्वांना सुरक्षिततेचा इशारा दिला व उपस्थित सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
यानंतर एचपी ऑइल गॅस लिमिटेडचे कोल्हापूर प्रमुख अधिकारी बाबासाहेब सोनावणे यांनी हे एक बॉम्ब थ्रेड मॉक ड्रिल असल्याचे जाहीर केले. कोणतीही पूर्वकल्पना नसताना देखील सर्व शासकीय विभागांनी अत्यंत कमी वेळेत दाखवलेली तत्परता प्रशंसनीय होती. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख प्रसाद संकपाळ, दहशतवाद विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बाबर, कागल एमआयडीसी फायर ब्रिगेड विभागाचे प्रमुख संदीप माने, गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनचे पी. वाय. पाटील, बॉम्ब विरोधी पथकाचे राजेंद्र संताराम तसेच एचपी ऑइल गॅसचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.