कागल: कागल तालुक्यात सर्व गणेश मंडळांनी गणेशोत्सव शांततेत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केल्याबद्दल पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी त्यांचे कौतुक केले आहे. अनेक मंडळांनी या काळात विविध सामाजिक उपक्रम राबवले. हे उपक्रम केवळ उत्सवापुरते मर्यादित न ठेवता वर्षभर राबवण्याचे आवाहन लोहार यांनी केले.

येथील शाहू वाचनालयामध्ये आयोजित गणराया अॅवॉर्ड वितरण समारंभात ते बोलत होते. “भारतीय संस्कृतीमध्ये सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. गणेशोत्सवाच्या काळात तरुण मंडळांनी आरोग्य तपासणी शिबिरे, गाव स्वच्छता, वृक्षारोपण, महाप्रसाद, आणि लक्षवेधी देखावे असे प्रेरणादायी उपक्रम राबवले,” असे लोहार यांनी सांगितले.


उत्सव काळात कार्यक्रम वेळेवर पार पाडावेत आणि महिलांसह सर्वांचा सहभाग वाढवावा, असेही त्यांनी सुचवले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार यांनी केले. सूत्रसंचालन विठ्ठल भोपळे यांनी, तर आभार उपनिरीक्षक रमेश तावरे यांनी मानले.

यावेळी झलक फ्रेंड सर्कल (कसबा सांगाव), श्री गणेश तरुण मंडळ (गोरंबे), आणि हॅप्पी क्लब कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ (म्हाकवे) यांना ‘गणराया अॅवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. पो. नि. गजेंद्र लोहार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबतच अमित पाटील, रूपाली गायकवाड, नितीन कांबळे, सुनील कुंभार, आणि आदर्श पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. गोपनीय सुनील पाटील, प्रभाकर पुजारी, ऋषीकेश भोजे, गीता जमदाडे, राजदीप पाटील, ऋषीकेश ढोले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.